मोह, माया आणि मेस्सी

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
 
वेध..
 
हेमंत सालोडकर
lionel messi फुटबॉल चाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती तो अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी अनेक वर्षांनंतर भारतात आला. तो तीन दिवस भारतात राहिला. त्याच्यासोबत त्याचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल होते. भारत भेटीत त्याने कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या चार मोठ्या शहरांना भेटी दिल्या. मेस्सी येणार म्हणून भारतात त्याच्या स्वागतासाठी चाहत्यांनी जोरदार तयारी केली. पहिल्या दिवशी कोलकाता येथे त्याचे स्वागत झाले. कोलकात्यात मेस्सी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. सुरुवातीला सत्कार सोहळा यथोचित पार पडला. पण हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांनी स्टेडियममध्ये संताप व्यक्त करीत राडा केला. मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. अनेकांनी तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र मेस्सी फार वेळ न थांबल्याने चाहते संतप्त झाले आणि सॉल्ट लेक स्टेडियमवर मिठाचा खडा पडावा तशी परिस्थिती निर्माण झाली. मेस्सी आला आणि गोंधळ घालून गेला असेच म्हणावे लागेल. मेस्सीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकून निषेध व्यक्त केला.
 
 

मेस्सी  
 
 
जेव्हा लोक आपल्यासाठी हजारो रुपये खर्च करून येतात, तेव्हा जागतिक स्तरावरच्या खेळाडूची जबाबदारी अधिक वाढते. आपल्या अनुपस्थितीने परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असे कळल्यावर त्याने लोकांना शांत करणे अपेक्षित होते. पण स्टेडियमवर काय गोंधळ सुरू आहे याची जराही माहिती नसल्याने तो आल्या पावली परत गेला असावा. कोलकातामध्ये फुटबॉल हा क्रीडा प्रकार लोकप्रिय आहे. मेस्सी येथे सामना खेळेल अशी माहिती होती. पण मेस्सी फक्त 10 मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मंत्री होते. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने एकही किक मारली नाही. इतके पैसे आणि वेळ वाया गेला असे, एका चाहत्याने सांगितले. मेस्सीभोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते. त्यांनाच सोबत ठेवायचे होते तर मग आम्हाला का बोलावले? आमचे पैसे वाया गेले. पैसे भरून मेस्सीचा चेहराही नीट पाहता आला नाही, असा संताप दुसèया चाहत्याने व्यक्त केला. येथे दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे की, आपल्या दर्शनासाठी हजारो रुपये घेतले जात आहेत, हे मेस्सीला तरी माहीत होते की नाही, हाही प्रश्नच आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आयोजकांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मेस्सीसारख्या दिग्गज खेळाडूच्या कार्यक्रमासाठी मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने चाहत्यांचा संताप उफाळून आला. मेस्सीचा भारत दौरा ऐतिहासिक ठरण्याची अपेक्षा होती, पण कोलकात्यातील गोंधळाने गालबोट लागले. याचा परिणाम म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक शताद्रू दत्ताला अटक करण्यात आली. या घटनेच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. या घटनेसाठी कारणीभूत ठरलेल्यांची चौकशी केली जाईल. दोषींना शिक्षा होईल. पण जे चाहते मेस्सीला पाहण्यासाठी आले होते, त्यांच्या भावनांची दखल कोण घेईल, हा मोठा प्रश्न आहे. असाच गोंधळ यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल 18 वर्षांनी आयपीएल चषक जिंकल्यावर उडाला होता. चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाच्या विजयानिमित्त झालेल्या कार्यक्रमात चेंगरीचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. तशी गंभीर स्थिती कोलकात्यात निर्माण झाली असती तर किती लोकांचा जीव गेला असता याची कल्पनाही करवत नाही.
मेस्सीने नंतर हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथेही भेट दिली. पण तेथे कोलकात्यापासून धडा घेत म्हणा किंवा उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम व्यवस्थित झाले. कोलकात्यात जेवढी बेशिस्त होती त्याच्या विपरीत स्थिती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होती. अतिशय दिमाखदार सोहळा झाला. स्टेडियमवर हजारो चाहत्यांनी ‘‘मेस्सी-सचिन’’चा जयघोष केला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, राजकारणी उपस्थित होते.lionel messi एकेक कलाकार येऊन मेस्सीशी हस्तांदोलन करीत होते. मेस्सीसुद्धा अतिशय शांतपणे सर्वांशी बोलत होता. असेच नियोजन कोलकात्यात असते तर तेथील कार्यक्रमाचा आनंद लोकांना घेता आला असता. पण कोलकात्यात गोंधळ उडाला. कोलकाताच्या घटनेपासून धडा घेत यापुढे तरी मेस्सी किंवा त्यासारख्या मोठ्या खेळाडूला सार्वजनिक ठिकाणी आणल्यानंतर काय खबरदारी घ्यावी, याची दक्षता घेतली पाहिजे.
9850753281