अनिल कांबळे
नागपूर,
cat snake हिंगणा परिसरातील वानाडोंगरी येथील गणेश कॉलनीत सोमवारी सकाळी विजय रहांगडाले यांच्या दुचाकीच्या डिक्कीत चक्क दुर्मिळ कॅट स्नेक आढळला. दुचाकीतून काहीतरी वस्तू बाहेर काढताना चालकाला साप दिसल्यानंतर क्षणिक भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडत असताना त्यांच्या दुचाकीच्मया डिक्कीत अचानक साप दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत विदर्भ सर्पमित्र समितीच्या सदस्यांना संपर्क साधला.
माहिती मिळताच सर्पमित्र आकाश मेश्राम, आकाश मंडल व रोहन भट हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरक्षित पद्धतीने दुचाकीची तपासणी करून साप बाहेर काढला. तपासणीनंतर हा साप दुर्मिळ प्रजातीतील ‘कॅट स्नेक’ (मांजर प्रजाती) असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली. हा साप कोलुब्रिडे प्रजातीचा असून अर्धविषारी (सेमी व्हेनमस) आहे. मानवासाठी तो सामान्यतः धोकादायक नसला तरी लहान किटक, पाली, उंदीर व पक्ष्यांसाठी घातक ठरू शकतो. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅट स्नेक हा शांत स्वभावाचा, प्रामुख्याने निशाचर साप असून तो बहुधा झाडांवर, कवेलूच्या घरांजवळ किंवा दगडी भागात आढळतो.cat snake पावसाळा व थंडीच्या काळात अन्नाच्या शोधात तो मानवी वस्तीत येण्याची शक्यता अधिक असते. संपूर्ण कारवाईनंतर सर्पमित्रांनी सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले.