चंद्रपूर,
Dr. Mohanji Bhagwat जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पं. दीनदयाल उपाध्याय चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल साकारले गेले आहे. ते उत्तमतेने चालावे ही केवळ या संस्थांचीच जबाबदारी नाही, तर रूग्णालयासाठी पूरक अशी सेवा व्यवस्था उभी करण्याचे दायित्व समाजाचेही आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
पं. दीनदयाल उपाध्याय चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण थाटात
पं. दीनदयाल उपाध्याय चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर रोजी सकाळी डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मंचावर चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडशेनचे मुख्य सल्लागार डॉ. कैलाश शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन प्रभृती उपस्थित होते.
डॉ. भागवत पुढे म्हणाले, ‘शिक्षण’ आणि ‘आरोग्य’ या दोन अत्यावश्यक सेवा अगदी उत्तम दर्जाच्या आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात मिळाल्या पाहिजे. या कॅन्सर रूग्णालयाच्या प्रशासनाने या पध्दतीची आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. पण रूग्णाच्या कुटुंबाला धीर देण्याचे काम, रूग्णासोबत आलेल्यांच्या राहण्याची, त्यांच्या जेवणाची व्यवस्था उभी करण्याचे काम कोण करेल, तर ती जबाबदारी समाजाने उचलली पाहिजे. कारण कॅन्सर हा दुर्धर रोग असून, तो केवळ रूग्णालाच नव्हे तर अवघ्या कुटुंबाला उध्द्वस्त करतो. ज्या कुटुंबात असा रूग्ण असतो त्या कुटुंबावर होणारे आर्थिक आणि मानसिक परिणाम मोठे व्यापक असतात. याचा विचार टाटा ट्रस्टने केला असेलच. पण ही केवळ त्यांचीच जबाबदारी नाही, तर समाजाचीही आहे.
कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत. आता तर, कॅन्सरचे कारण नसलेले जगात काय आहे, असा प्रश्न उपस्थित व्हावा एवढी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. त्याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. हे संकट अगदी कुणावरही येऊ शकते. त्यामुळे सारा समाज सेवाभावी वृत्तीने अशा रूग्णाच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभार राहावा, असे आवाहन डॉ. भागवत यांनी यावेळी केले.प्रास्ताविक डॉ. कैलाश शर्मा यांनी केले. पं. दीनदयाल उपाध्याय चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल चार मलज्याचे सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले, 140 खाटांची सुविधा देणारे, अत्याधुनिक निदान व उपचार यंत्रणा असलेले, रेषीय प्रवेगक, बे्रकीथेरपी, केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी यासह आधुनिक प्रयोगशाळेने सज्ज असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. आभार मयुर नंदा यांनी मानले. तत्पूर्वी, मंचावरील मान्यवरांनी डॉ. मोहनजी भागवत यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला.
आचारसंहितेमुळे राजकीय पुढारी प्रेक्षकांत!
सध्या चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने या लोकार्पण सोहळ्याच्या मंचावर कुणीही राजकीय पुढारी उपस्थित नव्हता. तर ज्यांनी या रूग्णालयाचे स्वप्न बघितले आणि सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला ते आमदार सुधीर मुनगंटीवार, सपना मुनगंटीवार, पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे आदी प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते.