मोठा घोटाळा... सरकारी नोकरीच्या नावाखाली 'सायबर फसवणूक'

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
ASI recruitment scam सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या सायबर भरती घोटाळ्याचा दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने पर्दाफाश केला आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI), संस्कृती मंत्रालयाच्या नावाने बनावट भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

ASI recruitment scam
 
पोलिस तपासात उघड झाल्यानुसार, आरोपींनी ASI च्या अधिकृत संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल करत एक बनावट सरकारी वेबसाइट तयार केली होती. या संकेतस्थळावर क्युरेटर आणि ज्युनिअर असिस्टंट अशा एकूण ९१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. सरकारी लोगो, रंगसंगती, मांडणी आणि फॉरमॅट अगदी अधिकृत वेबसाइटसारखेच असल्याने उमेदवारांना कोणताही संशय येऊ नये, अशी खबरदारी आरोपींनी घेतली होती.या बनावट भरती प्रक्रियेचे दुवे कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटांमध्ये, सोशल मीडियावर आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आले. त्याला प्रतिसाद देत शेकडो उमेदवारांनी अर्ज केले, त्यापैकी सुमारे १५० उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी निवडल्याचे दाखवण्यात आले. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया अधिकृत वाटावी यासाठी आरोपींनी जयपूर येथील एका नामांकित परीक्षा केंद्रात व्यावसायिक पद्धतीने लेखी परीक्षा देखील आयोजित केली.
 
 
दिल्ली पोलिसांच्या ASI recruitment scam माहितीनुसार, पुढील टप्प्यात सुमारे ५० टक्के उमेदवारांना ‘उत्तीर्ण’ घोषित करून मुलाखतीसाठी बोलावण्याची आरोपींची योजना होती. याच टप्प्यावर निवडीच्या बदल्यात मोठी रक्कम लाच म्हणून उकळण्याचा डाव होता. मात्र, त्याआधीच IFSO युनिटने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले.तांत्रिक निगराणी आणि खुफिया माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कुलदीप आणि पियुष अशी असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घोटाळ्यामागे आणखी किती लोक सहभागी आहेत, याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.