‘धुरंधर’ भाजपाचा दिग्विजय

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
अग्रलेख
bjps wins राजकारणात निवडणुकीचे मोठे महत्त्व असते. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेची दारे उघडत असतात आणि सत्ता हा असा गुलाबजाम असतो की, शुगर कितीही वाढणार असली तरी तो कुणालाच सोडवत नाही. त्यामुळेच सारे राजकीय पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते प्रत्येक निवडणुकीत हिरिरीने उतरतातच. लोकशाहीत हे अपेक्षितच आहे. विजय अपेक्षित असतो, तसा पराभवही अपेक्षित असतो. नगर पालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक धामधुमीत झाली. महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आणि आजच्या निकालांनी त्यांचा पहिला टप्पाही पार पडला. पहिला टप्पा होता नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा. 246 नगर पालिका आणि 42 नगर पंचायती अशा 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले आणि त्यांचा निकाल 21 डिसेंबरला लागला. बहुतांशी निकाल तसे अपेक्षितच आहेत. भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. सर्वाधिक नगरसेवक, नगराध्यक्ष भाजपाचेच निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी त्याखालोखाल चांगली कामगिरी केली आहे. एकुणात भाजपासह महायुतीची कामगिरी उत्तमच म्हटली पाहिजे. त्या तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. मनात आणले तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी ही आणखी एक आत्मपरीक्षणाची संधी आहे.
 
 

महायुती  
 
 
 
राज्याच्या निवडणूक आयोगाने 288 नगर पालिका व नगर पंचायतींचा कार्यक्रम गेल्या 4 नोव्हेंबरला जाहीर केला होता. 2 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. त्यात 263 स्थानिक स्वराज्य संस्थांचे भविष्य पेटीत बंद झाले होते. दुसऱ्या टप्प्यात, 20 डिसेंबरला उर्वरित स्थानिक संस्थांसाठी मतदान झाले. तसेच दीडेकशे सदस्यांच्या जागांसाठीही मतदान झाले. त्या साऱ्यांचा आज निकाल लागला. या निकालांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘धुरंधर’ ठरलेल्या भाजपाच्या दिग्विजयासह महायुतीची मैफिल या निकालांनी आणखी बहरलेली असताना काँग्रेससह महाविकास आघाडीला अद्याप सूर गवसलेला नाही, असेच करावे लागेल.
घराणेशाहीचा विषय अनेक ठिकाणी होता. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या. काही ठिकाणी प्रचंड चुरस होती. त्या-त्या ठिकाणी मतदारांनी आपापला कौल दिला आणि निकालातून आपल्या मनातले दाखवून दिले. सर्वपक्षीय घराणेशाहीवादी नेत्यांचा मुखभंग काही ठिकाणी झाला, तर अनेक ठिकाणी घराणेशाहीविरोधी प्रचाराचा विचार न करता लोकांनी प्रस्थापित कुटुंबातील व्यक्तींना निवडूनही दिले. त्याला स्थानिक समीकरणे कारणीभूत होती. परंतु, एकुणात हा निकाल म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीवर निमशहरी भागांचा विश्वास असल्याचे सांगणारा आहे. महाविकास आघाडी ही महायुतीची सशक्त विरोधक म्हणून नजीकच्या काळात उभी राहू शकणार नाही, हेही या निकालाने सांगितले आहे. महायुतीमधील एकवाक्यता आणि महाविकास आघाडीतील गोंधळ यातूनच या निवडणुकीत काय घडणार आहे ते लक्षात आलेच होते. अपेक्षेप्रमाणेच घडले. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर सहाच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीची प्रचंड घसरण झाली. लोकसभा निवडणुकीतील कौलामुळे महाविकास आघाडीला अहंगंडाने पछाडले होते. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच येणार असा वृथा विश्वास महाविकास आघाडीला वाटू लागला होता. आघाडीतील घटक पक्ष विधानसभेच्या वेळी बेसावध राहिले आणि लोकसभेच्या झटक्याने सावध झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकली. महायुतीने पुढेही सावध पवित्रा कायम ठेवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर व त्यासाठीच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यासाठी पूर्वतयारी केली आणि अखेर ही निवडणूक सुद्धा महायुतीने जिंकली. यातील प्रमुख योगदान भाजपाचे. त्याखालोखाल कामगिरी आहे दोन उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षांची. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही घटक पक्ष अजिबात चमक दाखवू शकले नाहीत. एकेक टापू, एकेक शहर अशी काही नेते वा पक्षांची छाप दिसते, पण राज्याच्या पातळीवर भाजपाखेरीज इतर कुणाचीही छाप नाही. राज्याच्या पातळीवर एकमेव उठून दिसणारे यश आहे ते भाजपाचे आणि ते यशच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. आता नवे वर्ष उजाडल्याबरोबरचा पंधरवडा महानगर पालिका निवडणुकीच्या धामधुमीचा असेल. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील. एकुणात ग्रामीण, शहरी व निमशहरी अशा तिन्ही स्तरांचा कौल लवकरच स्पष्ट होणार आहे. त्या निवडणुकीतही भाजपाची कामगिरी उत्तम राहील, असे या निकालांचे सांगणे आहे. भाजपाची निवडणुकीतील कामगिरी नेहमीच उजवी असते याची काही कारणे आहेत. पहिली बाब अशी की, आता फक्त पक्षाच्या किंवा नेत्याच्या नावावर निवडणुका जिंकता येत नाहीत. अपवादात्मक ठिकाणी यश मिळेलही, पण व्यापक यश मिळविण्यासाठी पक्ष व नेते मातब्बर असले तरी उमेदवारही चांगले असावे लागतात. भाजपामध्ये या गोष्टींची नीट काळजी घेतली जाते. शंभर टक्के ठरविल्याप्रमाणे होत नसेलही, पण शंभर टक्के नियोजन केल्यावर सत्तर-ऐंशी टक्के या प्रमाणात ते प्रत्यक्षात उतरत असते. हा पक्ष कागदावर तयारी करतो आणि नेते-कार्यकर्त्यांना कामाला लावतो. जबाबदाऱ्यांचे वाटप करतो आणि कामांचा हिशेब मागतो. तसे अन्य कोणत्याही पक्षात घडत नाही.bjps wins काँग्रेसच्या नेत्यांना आजही असे वाटत असते की, मोदी किंवा फडणवीस यांच्या विरोधात अँटिइन्कम्बन्सी असल्यामुळे विजय आपलाच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप साहेबांच्या जादूगार असण्यावर विश्वास आहे. आपली पुण्याई महाराष्ट्रात अजूनही चालेल असा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा समज आहे. वास्तवात असे काहीही घडत नसते. निवडणूक गंभीरपणे लढावी लागते आणि ते फक्त भाजपाच करते. महायुतीतील घटक पक्षांना थोडाफार त्या पक्षाचा कित्ता गिरवावा लागतो. त्याचा त्यांना अर्थातच फायदा होतो. तो फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला झाला आहे. दुसरे म्हणजे सत्तेत असतानाही सर्व निवडणुका जिंकण्याची ईर्ष्या ठेवणे अवघड असते. सत्तेतल्या लोकांना आपलीच सत्ता सर्व थरांत येईल, असा समज होणे स्वाभाविक असते. मात्र, भाजपा कधीही बेसावध राहत नाही. सत्तेत असो वा नसो, निवडणूक जिंकण्यासाठी हा पक्ष हिरिरीने झटतो. त्याचा फायदा भाजपाला होतो. यातून इतरांनी शिकले पाहिजे. सत्तेत नसलेल्यांनी अँटिइन्कम्बन्सी वगैरेची फँटसी बाजूला ठेवून दिली पाहिजे. गेल्या दशकभरात देशाचे आणि महाराष्ट्राचेही राजकारण बदलले आहे. तसे ते गावागावाचे आणि शहरांचेही बदलले आहे. गावे, छोटी नगरे आणि महानगरे या सर्व ठिकाणच्या नागरिकांच्या काही अपेक्षा आणि आकांक्षा आहेत. त्यांना प्रतिसाद देणारा नेता, पक्ष आणि तसे सर्वाधिक उमेदवार देणे ज्यांना जमेल, त्यांच्या पदरात जनता आपले माप टाकत असते. निमशहरी भागांतील या निवडणुकीचा निकाल एकीकडे सुशासनावर विश्वास टाकतानाच अधिकचे काही मागणाराही आहे. जिथे कुठे महायुतीला विजय मिळाला नसेल, तेथे काय चुकले याचा धांडोळा घेतला तर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत कामी येणारे मुद्दे सापडतील. हेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बाबतीत खरे आहे. आपल्या समस्या-प्रश्न सोडविले जाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनागोंदी संपविणे हे नागरिकांना-मतदारांना हवे आहे. हे काम केंद्रात व राज्यात सत्ता असलेला पक्ष म्हणजे भाजपा चांगल्या रीतीने करू शकतो, असा विश्वास दर्शवितानाच, अनेकानेक अपेक्षा ठेवून मतदारांनी महायुतीला हा कौल दिला आहे हेही समजून घेतले पाहिजे. विश्वास असेल तेथे अपेक्षा असतातच आणि अविश्वास दर्शविला गेला असेल तर अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त झालेले असते, एवढेसे गमक समजून घेतले तर निवडणुकीच्या लोकतांत्रिक अन्वयार्थाच्या तळाशी पोहोचणे कुणालाही कठीण नाही. पुढचे घोडामैदान तीन आठवड्यांवर आहे.