बुलंदशहर,
bulandshahr-viral-video उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील एक घटना सध्या सर्वांचे मन हेलावून टाकत आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे एक वडील आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या लेकीला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होता. मात्र हा साधा वाटणारा क्षण आयुष्यभरासाठी वेदनेची आठवण ठरेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
स्याना कोतवाली रोडवरील शाळेच्या गेटजवळ पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने ई-रिक्षातून उतरून आपल्या मुलीचा हात धरला. तिची स्कूल बॅग नीट सांभाळत त्याने तिला शाळेच्या गेटमधून आत सोडले. ही संपूर्ण दृश्ये शाळेबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मुलगी आत गेल्यानंतर तो वडील मागे वळला आणि काही पावले चालताच अचानक जमिनीवर कोसळला. गेटसमोरच हा प्रकार घडताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. bulandshahr-viral-video काहींनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. गंभीर अवस्थेत त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी स्थिती चिंताजनक असल्याचे सांगत त्याला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र पुढील उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला.
सौजन्य : सोशल मीडिया
मृत व्यक्तीचे नाव ४० वर्षीय तारिक मेवाती असे असून तो तारिक नगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. bulandshahr-viral-video शाळेच्या दारात वडिलांचा असा अचानक अंत झाल्याचे कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक जण भावूक प्रतिक्रिया देत आहेत. निष्पाप मुलीला शाळेत सोडताना वडिलांनी तिला शेवटचा निरोप दिला, हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.