वाशीम,
Jal Jeevan Mission केंद्र व राज्य शासनाच्य जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र, योजनेंतर्गत अपूर्ण कामे कधी पूर्ण होणार, आणि ग्रामस्थांना प्रत्यक्षात नळाद्वारे शुद्ध पाणी केव्हा मिळणार, असा सवाल आता ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात एकूण ७४१ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ २९७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ४४४ नळ योजनांची कामे अद्याप अपूर्ण असून, अनेक ठिकाणी ती अर्धवट अवस्थेतच रखडली आहेत. ग्रामीण भागातील गावकर्यांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजना राबविण्यात आल्या. सुरुवातीला कामांना वेग मिळाल्याचे चित्र दिसले. मात्र, जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उदासीन कारभारामुळे या योजनांचा वेग मंदावला. परिणामी, अनेक गावांत नळ योजनांची कामे अर्धवट पडली आहेत. काही गावांत पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले, मात्र कामे पूर्ण न झाल्याने ते रस्ते तसेच राहिले आहेत. यामुळे वाहतूक अडथळा, अपघातांचा धोका तसेच दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शुद्ध पाणी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना सध्या ग्रामस्थांसाठी सोयीऐवजी गैरसोयीची ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ७४१ नळ योजना मंजूर असून, आतापर्यंत २९७ कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही ४४४ नळ योजनांची कामे अपूर्ण आहेत. अनेक नळ योजनांची कामे अर्धवट आहेत. नळ योजनांची कामे पूर्ण केव्हा होणार? याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागून आहे.