हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा दिला अलर्ट!

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Maharashtra cold wave महाराष्ट्रातील बहुतांश भागात सध्या शीतलहरीची स्थिती निर्माण झाली असून किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने दिवसभर गारवा जाणवत आहे. या थंडीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढण्याची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Maharashtra cold wave 
राज्यभर थंडीचा प्रभाव जाणवत असला तरी पुणे व पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये थंडीची तीव्रता वेगवेगळी असल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात सकाळच्या वेळेत धुके आणि दिवसा कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये गारठा अधिक जाणवत असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
 
 
आज, सोमवार 22 Maharashtra cold wave डिसेंबर रोजी राज्यात थंडीची लाट अधिक तीव्रतेने जाणवणार असून पुढील काही दिवस तापमान कमीच राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेषतः पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारठा अधिक तीव्र राहण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि वातावरणातील आर्द्रतेत घट झाल्याने ही शीतलहरीची स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वच्छ आकाश आणि कोरड्या हवामानामुळे रात्री उष्णता झपाट्याने निघून जात असून त्यामुळे किमान तापमानात मोठी घसरण होत आहे.या शीतलहरीचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पहाटे किंवा रात्रीच्या वेळेत वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना धुक्यामुळे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याने नागरिकांना उबदार कपडे वापरण्याचे, लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याचे आणि पहाटे अनावश्यक बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. धुक्याच्या वेळी वाहन चालवताना हेडलाईट आणि फॉग लाइटचा वापर करून वेग कमी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, मुंबईत किमान तापमान सुमारे 20 अंश तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. पुणे आणि सोलापूरमध्ये किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले असून मराठवाड्यातही तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. एकूणच, पुढील 24 तास राज्यासाठी थंडीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.