नागपूर,
Municipal Commissioner office ऑरेंज सिटी वॉटर वर्क्समधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरपासून कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंत्राटी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने मनपा आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागील १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना रँडस्टॅन्ड कंपनीमार्फत नोटीस देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नोकरी गेल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचा आरोप करण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रवीण दटके, संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव व भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी केले. मनपा आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा रोखण्यात आल्यानंतर आयुक्त अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा करण्यात आली. Municipal Commissioner office यावेळी आमदार प्रवीण दटके यांनी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली. कोणत्याही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. यावर मनपा आयुक्तांनी प्रशासनासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मोर्चामध्ये सर्व मीटर रीडर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सौजन्य: सुरेश चाव्हारे, संपत मित्र