नागपूर
Nagpur municipal elections 2026 नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्यापासून , म्हणजे मंगळवार, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी शहरात मतदान होणार आहे, तर मतमोजणी १६ जानेवारी रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवारांना मंगळवार, ३० डिसेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार, महानगरपालिकेच्या १० झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.शहरातील ३८ प्रभाग १० झोनमध्ये विभागण्यात आले आहेत. संबंधित झोनमधील प्रभागातील उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतील. या ३८ प्रभागांपैकी एकूण १५१ जागांपैकी ७६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीच्या महिलांसाठी १५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ६, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २० तर खुल्या प्रभागातील ३५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ३० जागा राखीव असून, त्यापैकी १५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागा असून त्यापैकी ६ महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण ४० जागा राखीव आहेत, त्यापैकी २० जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित ६९ खुल्या प्रभागातील जागांपैकी ३५ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी २०२६ असून, उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ३ जानेवारी रोजी होणार आहे.या निवडणुकीसाठी नागपूर शहरातील राजकीय गतीविधी सुरू झाल्या आहेत. स्थानिक राजकीय पक्ष तसेच स्वतंत्र उमेदवार आता सक्रियपणे प्रचाराला सुरुवात करत असून, नागरिकांचा सहभाग आणि मतदान हा पुढील प्रशासनाच्या दिशेवर महत्त्वाचा ठरणार आहे.