आत्मस्वरूपाची ओळख म्हणजे गुरू : डॉ. सुशील देशपांडे

श्रींच्या जन्मोत्सवास प्रारंभ

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Nrusinh Saraswati Swami Maharaj birth anniversary, भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मोत्सवाला २२ डिसेंबर पासून गुरु मंदिर संस्थान येथे भक्तिभावाने सुरुवात झाली.या पावन प्रसंगी झालेल्या कीर्तनात डॉ. सुशील देशपांडे यांनी गुरु आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात असा मोलाचा संदेश दिला.

 Nrusinh Saraswati Swami Maharaj birth anniversary,
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त कीर्तन करताना डॉ. देशपांडे यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘गुरु तोचि देव ऐसा ठेवी भाव’ या अभंगाचे प्रभावी निरूपण केले. ज्ञानमूर्ती असलेले गुरु आपल्या शिष्यांना कर्मबंधनातून मुक्त करतात, हे त्यांनी विविध दृष्टांतांच्या माध्यमातून अत्यंत रसाळ शैलीत स्पष्ट केले. कीर्तनाला तबल्याची साथ धीरेंद्र गावंडे, हार्मोनियमची साथ उमेश आजणकर तर चिपळ्यांची संगत गुलाब पापळे यांनी केली. भक्तिभावाने न्हालेल्या या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म कारंजा येथे झाला, हे कारंजेकरांचे परम भाग्य आहे, असे गौरवोद्गार डॉ. सुशील देशपांडे यांनी यावेळी आपल्या कीर्तनात काढले. जन्मोत्सव सोहळ्यास शेकडो भाविकांची उपस्थिती होती. तसेच अनेक संत व सद्गुरूंचीही उपस्थिती या वेळी दिसून आली. कार्यक्रमाचे संचलन प्रदीप कुलकर्णी व अजय खेडकर यांनी केले. तर आभार प्रकाश भोळे यांनी मानले. यावेळी आर्वीकर शास्त्री यांनी कीर्तनकारांचा सत्कार केला. याप्रसंगी दिनेश जोशी गुरुजी यांनी गुरुचरित्रातील अध्यायाचे वाचन केले. विश्वस्त मंडळ व आयोजन समितीच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दीड महिना चालणार्‍या या भव्य उत्सवाला भक्तिभावात सुरुवात झाली आहे. दीड महिना चालणार्‍या विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.