महिलांची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी ‘सरस’ महोत्सव

२३ ते २६ डिसेंबरदरम्यान गडचिरोलीत आयोजन

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
Saras festival Gadchiroli, ग्रामीण व आदिवासी भागातील महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने जिल्हा स्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे भरविण्यात येणार आहे.
 

 Saras festival Gadchiroli, women self-help groups exhibition 
या विक्री व प्रदर्शनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ६० महिला स्वयंसहायता बचत गटांचे स्टॉल सहभागी होणार असून, महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध प्रकारच्या दर्जेदार उत्पादनांची विक्री येथे केली जाणार आहे. यामध्ये मध, जांभूळ व सिताफळ प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, मोहापासून बनवलेले खाद्यपदार्थ, लाकडी शोभेच्या व हस्तकलेच्या वस्तू, कुक्कुटपालन व मत्स्यपालनाशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच पीएमएफएमई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी विविध उत्पादनेही येथे उपलब्ध असतील.
 
 
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व Saras festival Gadchiroli, आदिवासी भागातील महिलांना शहरी बाजारपेठेतील विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, लघुउद्योगांच्या माध्यमातून कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उमेद अभियानांतर्गत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रदर्शनातून ग्रामीण आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना घडणार आहे.प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेली लोणची, चटण्या, घरगुती मसाले, पापड, कुरडई, वनउपजापासून तयार केलेले खाद्यपदार्थ, लाकडी हस्तकला व ग्रामीण कलाकुसरीची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यासोबतच सावजी मटन, बंगाली फिश, बंगाली स्वीट्स तसेच भामरागड, एटापल्ली व कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉलही आकर्षण ठरणार आहेत.
 
 
या ‘सरस’ विक्री व प्रदर्शनामुळे ग्रामीण नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांना अस्सल ग्रामीण चव अनुभवण्याची आणि थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व नागरिकांनी या जिल्हा स्तरीय भव्य ‘सरस’ विक्री व प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.