रत्नधारणेवर वैज्ञानिक संशोधनाची गरज– डॉ. अतुल वैद्य यांचे प्रतिपादन
दिनांक :22-Dec-2025
Total Views |
नागपूर,
dr atul vaidya कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथील वेदांग ज्योतिष विभागात केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने अभिनव भारती परिसर, वारंगा येथे आयोजित २१ दिवसीय उपयोजित रत्नशास्त्र कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरु डॉ. अतुल वैद्य यांनी रत्नधारणेमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा वैज्ञानिक तसेच ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल संशोधनात्मक अभ्यास होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
रत्नांविषयी असलेले गैरसमज दूर करून त्यामागील शास्त्रीय आधार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. प्रास्ताविकात प्राचीन भारतीय विज्ञान व मानव्यशास्त्र संकायाचे अधिष्ठाता तसेच कार्यशाळेचे समन्वयक आचार्य कृष्णकुमार पाण्डेय यांनी कार्यशाळेचा सविस्तर आढावा सादर केला. रत्नशास्त्राचे शास्त्रीय पैलू, त्याची उपयुक्तता आणि सामाजिक भान निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य अतिथी डॉ. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी कार्यशाळेचे कौतुक करत रत्नांचे औषधी व सकारात्मक गुणधर्म मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्यास सहाय्यभूत ठरतात, असे मत व्यक्त केले. तर सारस्वत अतिथी, पाणिनी संस्कृत विद्यापीठ, उज्जैन येथील ज्योतिष विभागप्रमुख डॉ. शुभम् शर्मा यांनी रत्नांची वैदिक परंपरा आणि आजच्या काळातील तिचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले.dr atul vaidya कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याचप्रसंगी ‘वास्तु विवेक’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले. हा ग्रंथ डॉ. कृष्णकुमार पाण्डेय यांच्या मूळ लेखनावर आधारित असून त्याचा मराठी अनुवाद डॉ. अंबालिका सेठिया यांनी केला आहे. यावेळी डॉ. अनिल कुमार, अन्वेश, डॉ. रेणुका करंदीकर यांच्यासह विविध प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.