तभा वृत्तसेवा उमरखेड,
Sugarcane transport meeting, ऊस वाहतुकीदरम्यान होणाèया अपघातांना आळा घालण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शनिवारी वसंत साखर कारखाना, पोफाळी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोफाळीचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेंबडे व उमरखेड येथील वाहतूक निरीक्षक अमोल गुंडे यांनी संयुक्तपणे भेट दिली.
यावेळी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रकचालक व मालक यांची बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती दिली. ऊस वाहतूक करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
वाहतूक निरीक्षक अमोल गुंडे यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक
बैठकीदरम्यान वाहनांच्या ट्रॉलीच्या मागील बाजूस रेड रिफ्लेक्टर किंवा रेडियम लावणे, रात्रीच्या वेळी हेडलाईट व टेललाईट सुरू ठेवणे, वाहन चालवताना गाणे न वाजवणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अरुंद रस्त्यावर व वळणावर ओव्हरटेक टाळावा, ट्रॉलीच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरू नये तसेच ऊस व्यवस्थित दोरी किंवा साखळीने बांधलेला असावा, अशा सूचना देण्यात आल्या.
डबल ट्रॉली जोडलेली असल्यास विशेष दक्षता घेणे, ट्रॅक्टर फक्त नेमून दिलेल्या पार्किंग झोनमध्येच उभा करणे, चालकाकडे परवाना व वाहनाची आवश्यक कागदपत्रे असणे, प्रवासापूर्वी ब्रेक व टायर तपासणे, ट्रॉली मागे घेताना क्लिनरची मदत घेणे तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे याबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले. या सर्व सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उमरखेड येथे पदभार स्वीकारल्यापासून वाहतूक निरीक्षक अमोल गुंडे यांनी अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.