T20 मध्ये ४ हजार धावा, कोहली–रोहितनंतर ‘या’ क्लबमध्ये स्थान मिळवणारी तिसरी भारतीय

    दिनांक :22-Dec-2025
Total Views |
विशाखापट्टणम, 
smriti mandhana वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळावर मात करत स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या भारत श्रीलंका महिला संघातील पहिल्या टी-२० सामन्यात स्मृतीने ४,००० धावांचा टप्पा पार करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर हा पराक्रम करणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. महिला विश्वचषक विजयानंतरच्या पहिल्याच टी-२० मालिकेत भारतीय संघाने दमदार सुरुवात करत श्रीलंकेवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
 
 
 
 
महिला T २ ०
 
 
 
या सामन्यात जेमिमा रोड्रिग्जने शानदार अर्धशतकी खेळी करत सामना गाजवला, मात्र ऐतिहासिक विक्रमामुळे सर्वांचे लक्ष स्मृती मानधनाकडे वेधले गेले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत ६ बाद १२१ धावांवर मर्यादित राहिला. विश्मी गुनारत्नेने सर्वाधिक ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या १४.४ षटकांत २ बाद १२२ धावा करत सहज विजय साकारला. जेमिमाने ४४ चेंडूंमध्ये १० चौकारांच्या मदतीने नाबाद ६९ धावा केल्या, तर स्मृतीने २५ धावांची संयमी खेळी केली.
या खेळीदरम्यान स्मृतीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४,००० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडच्या सुझी बॅट्सनंतर सर्वात जलद ४,००० धावा करणारी खेळाडू म्हणूनही स्मृतीने नाव कोरले. तिने केवळ ३,२२७ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला, तर बॅट्सने ३,६७५ चेंडू घेतले होते.
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय धावसंख्येत सुझी बॅट्स (४,७१६) अव्वल स्थानी असून, स्मृती आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (३,६५४) तिसऱ्या, तर श्रीलंकेची चमारी अटापट्टू आणि न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
भारतीय खेळाडूंमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा (४,२३१) अव्वल, विराट कोहली (४,१८८) दुसऱ्या, तर आता स्मृती मानधना (४,००७) तिसऱ्या स्थानावर आहे.smriti mandhana स्मृतीने आतापर्यंत १५४ टी-२० सामन्यांत १ शतक आणि ३१ अर्धशतकांसह ४,००७ धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्येही तिची कामगिरी तितकीच प्रभावी असून, ११७ सामन्यांत १४ शतकांसह ५,३२२ धावा तिच्या नावावर आहेत.