तुर्की,
Turkey parliament fight video, तुर्कीच्या संसदेतून धक्कादायक दृश्ये समोर आली असून, २०२६ च्या अर्थसंकल्पावरील मतदानापूर्वी खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तुर्की ग्रँड नॅशनल असेंब्ली (TBMM) मध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी संयम गमावल्याने सभागृह अक्षरशः युद्धभूमीत रूपांतरित झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान सत्ताधारी जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी (AK Party) चे बुर्सा खासदार आणि माजी मंत्री मुस्तफा वरांक बोलण्यासाठी उभे राहिले होते. याचवेळी विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टी (CHP) चे ग्रुप उपाध्यक्ष मुरत अमीर आणि खासदार इल्हामी आयगुन त्यांच्याकडे गेले. बजेटच्या मुद्द्यावरून झालेला वाद काही क्षणांतच शाब्दिक संघर्षातून शारीरिक हाणामारीत बदलला.दोन्ही पक्षांचे अनेक खासदार या वादात सहभागी झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. सुमारे दहा मिनिटे ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या गोंधळामुळे TBMM चे अध्यक्ष नुमान कुर्तुलमुस यांना संसदेचे कामकाज तात्पुरते स्थगित करावे लागले.
परिस्थिती शांत झाल्यानंतर खासदार पुन्हा सभागृहात परतले आणि अर्थसंकल्पावर मतदान घेण्यात आले. गोंधळाच्या वातावरणातच सरकारने आपले विधेयक मंजूर करून घेतले. संसदेत २०२६ चा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प कायदा तसेच २०२४ चा अंतिम लेखा कायदा मंजूर करण्यात आला. या प्रस्तावांच्या बाजूने ३२० मते पडली, तर विरोधात २४९ मते नोंदवली गेली.तुर्की संसदेत हाणामारीची ही पहिलीच घटना नसून, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्येही सत्ताधारी AK पक्ष आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार वादानंतर हाणामारी झाली होती. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे तुर्कीतील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.