अनिल कांबळे
नागपूर,
poisoned-rice : कीड लागू नये म्हणून तांदळाला लावलेली विषारी पावडर भाताद्वारे पाेटात गेल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. माही किशाेर उमाळे असे मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मानवशक्ती साेसायटी, बहादुरा राेड येथील रहिवासी माही उमाळे हिने 20 डिसेंबर राेजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घरातील स्टीलच्या डब्यात तांदूळ ठेवले हाेते. मात्र, त्या तांदळाला कीड प्रतिबंधक पावडर लावलेली हाेती. त्या तांदळाचा भात तयार केल्यानंतर माही हिने ताे भात खाल्ला. काही वेळातच तिची प्रकृती बिघडली. तिची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी तिला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला तातडीने मेडिकल रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर 21 डिसेंबर राेजी रात्री 9.40 वाजेच्या सुमारास डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. या घटनेची माहिती मेडिकल रुग्णालयाकडून मिळताच वाठाेडा ठाण्याचे पाेलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा अधिक तपास पाेलिस करत आहेत.
माहीने आत्महत्या केल्याची शक्यता
माही ही बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी हाेती. ती गेल्या काही दिवसांपासून तणावात हाेती. मात्र, याकडे कुटुंबियांचे लक्ष गेले नाही. तिने तांदळात टाकायचे विषारी औषध प्राशन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती वाठाेडा पाेलिसांनी दिली.