२६ डिसेंबरला नेमकी कशाची घोषणा करणार अजितदादा!

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
पुणे,
Ajit Dada announcement मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनंतर आता पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये युती तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंच्या मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार असून, त्यानंतर पुण्यात अजित पवार २६ डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. अजित पवारांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत की, कोणतीही अफवा ऐकून विश्वास ठेवू नका, सर्व काही २६ तारखेला स्पष्ट होईल.
 
 ajit
 
पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची तयारी करत आहेत. या युतीत दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही समावेश दिला जाऊ शकतो. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी युतीला विरोध दर्शवत, पक्षातून राजीनामा देण्याचा इशारा दिला होता; मात्र, यामुळे युतीच्या प्रक्रियेला फारसा फरक पडलेला दिसत नाही.
 
पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची आघाडी २५ किंवा २६ तारखेला जाहीर होणार असून, यासाठी स्थानिक नेते गुप्त बैठकीत चर्चा करत आहेत. शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे या बैठकीत सहभागी आहेत. स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना निकालाची माहिती पाठवली जाईल. आजच्या बैठकीत पुणे महानगरपालिकेतील निवडणूक व अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.