अभय दर्भे
आर्वी,
sumit-wankhede : जिल्ह्यात आर्वी संस्कार आणि संस्कृतीचे शहर म्हणून ओळख आहे. हे संत महात्म्यांचे शहर आहे. येथे फत विरोधाला विरोध असतो. सुख दु:खात एकत्र यणारे शहर म्हणून आर्वीचा आर्वीकरांना अभिमान आहे. आर्वी शहराने भारतीय जनता पार्टीला भरभरून दिले. भाजपानेही शहराच्या विकासाचा विडा घेतला आहे. आ. सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष आणि बहुमतात नगरसेवक निवडून आले. परंतु, येथे विजयाचा जल्लोष आणि आनंदाचा गुलाल उधळल्या गेला नाही. छत्रपतींना अभिवादन करीत सारे शांत झाले. कारण, दोन दिवसांपुर्वी आर्वीकरांनी आपली लेक गमावली होती. त्या लेकीला नपचा विजय समर्पित केला.

नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्ष व भाजपाचे नगरसेवक बहुमतात निवडून येत शहरात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विजय नोंदविला गेला. आ. सुमित वानखेडे यांनी आपल्या भाजपा नेते सुधीर दिवे यांना सोबत घेत पदाधिकार्यांना विश्वास देत ही निवडणूक जिंकली. मात्र, या विजयाच्या क्षणी नेहमीप्रमाणे गुलाल उधळत जल्लोष करण्याऐवजी भाजपाने संवेदनशीलतेचा आदर्श ठेवत आनंद साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तीन दिवसांपूर्वी शहरात शिकवणीला जाणार्या एका विद्याथिर्नीचा ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेची तीव्र जाणीव ठेवत आ. सुमित वानखेडे यांनी विजयाचा उत्सव न करता शोकाकुल कुटुंबाच्या भावनांचा सन्मान केला जावा अशा सुचना केल्या.
त्यांच्या सूचनांनुसार शहरात कुठेही गुलाल उधळण्यात आला नाही, फटाके फुटले नाहीत आणि कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून नवनियुत नगराध्यक्ष आणि नगरसेवक शहरात मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यासाठी निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांची संवेदनशीलताही तेवढीच महत्त्वाची आहे. हा विजय त्यांना आनंद देणारा निश्चितच ठरला. पण, गावातील लेकीचा जीव गेल्यानंतर शहरातील रस्ते गुलालाने माखल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना आवडले नसते. हे आपल्याला त्यांच्यासोबत राहिल्याने शिकता आले असल्याची प्रतिक्रिया आ. सुमित वानखेडे यांनी व्यत केली.
विजय राजकीय असतो माणुसकी कायमची असते! भाजपाने सामाजिक भान जपले. एका विद्यार्थिनीच्या अकाली जाण्याने शोकमग्न असलेल्या शहरात आनंदाऐवजी संयम आणि सहवेदना दाखवून आर्वीने माणुसकी दाखवली.