तभा वृत्तसेवा
राळेगाव,
bori-ichod-encroachment : तालुक्यातील बोरीइचोड येथील वस्तीला लागून महामार्गालगत अतिक्रमणांवर मंगळवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महामार्ग प्राधिकरण विभागाने बुलडोझर फिरवला. यात महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमणे करून केलेली बांधकामे हटविण्यात आली.
तालुक्यातील बोरी इचोड या गावावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 जातो. बोरी इचोड गावाला राष्ट्रीय महामार्गाचा पूल असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने पुलाच्या बाजूला लागून असलेल्या वस्तीजवळ छोट्या-मोठ्या वाहनांसाठी सेवा रस्ता दिलेला आहे. त्या रस्त्यांवर गावातील अनेकांनी अतिक्रमणे केली होती. काहींनी तर शेड टाकून त्यावर बांधकाम केले होते, तर अनेकांनी त्या रस्त्यावर टिनशेड ठोकून व्यवसाय सुरू केला होता. काही शेतमालकांनी त्या रस्त्यावर जनावरांसाठी गोठा बांधून त्या गोठ्यालगत कडबा कुटार भरला होता. ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या रस्त्यावर अतिक्रमण करून संपूर्ण रस्ताच गिळंकृत केला होता. त्यामुळे छोट्यामोठ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
रस्ता कामातही अतिक्रमणे अडथळा ठरत असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली. त्यानंतर महामार्गालगत असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. यादरम्यान काही नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. यापुढे महामार्गालगत असलेल्या रस्त्यावर नागरिकांनी जाणून-बुजून अतिक्रमण केल्यास त्यांचे साहित्य जप्त करण्यात येईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाèयांनी दिली. या अतिक्रमण मोहिमेत महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकाèयांसह कर्मचारी उपस्थित होते.