ढाका,
Elections in Bangladesh बांगलादेशात १२ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या निर्णयावर अंतरिम सरकार ठाम असून, देशातील राजकीय संक्रमण वेळापत्रकानुसारच होईल, असा पुनरुच्चार मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी केला आहे. दक्षिण व मध्य आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत सर्जियो गोर यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात युनूस यांनी निवडणुका, लोकशाही प्रक्रियेचे भवितव्य, व्यापारसंबंध तसेच तरुण राजकीय कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. युनूस यांनी स्पष्ट केले की देशातील नागरिकांना दीर्घकाळापासून हिरावून घेतलेला मतदानाचा हक्क पुन्हा मिळणार असल्याने लोकांमध्ये उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी आता सुमारे पन्नास दिवस शिल्लक असून, मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदान प्रक्रिया घडवून आणणे हेच अंतरिम सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडील हिंसक घटनांमुळे काही प्रमाणात चिंता निर्माण झाली असली तरी सरकारचे मनोबल भक्कम असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे युनूस यांनी नमूद केले.

युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे विशेष दूत सर्जियो गोर यांच्याशी झालेली चर्चा सुमारे अर्धा तास चालली. या संभाषणात बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील व्यापारसंबंध, शुल्क धोरण आणि भविष्यातील व्यापार करार यांवरही भर देण्यात आला. सर्जियो गोर यांनी अलीकडील शुल्कविषयक चर्चांमध्ये युनूस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या मते, बांगलादेशने अमेरिकन वस्तूंवरील परस्पर शुल्कात २० टक्के कपात करण्यात यश मिळवले आहे. युनूस यांनी सांगितले की दोन्ही देशांदरम्यान व्यापक व्यापार कराराच्या दिशेने काम सुरू असून, काही महत्त्वाच्या करारांवर सध्या चर्चा चालू आहे. या संवादादरम्यान हादी यांच्या हत्येचा मुद्दाही केंद्रस्थानी राहिला. युनूस यांनी आरोप केला की पदच्युत हुकूमशाही व्यवस्थेचे समर्थक निवडणूक प्रक्रियेला अडथळे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करत आहेत. तसेच काही फरार नेते जाणीवपूर्वक हिंसाचार भडकवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, अशा कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अंतरिम सरकार पूर्णपणे सज्ज असून, हिंसाचारामागील घटकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, इन्कलाब मंचने शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी जबाबदार व्यक्तींना तातडीने शिक्षा देण्याची मागणी तीव्र केली आहे. येत्या १३ व्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दोषींना न्यायालयासमोर उभे केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एफबीआय, स्कॉटलंड यार्डसारख्या आंतरराष्ट्रीय तपास संस्थांचा समावेश असलेल्या जलदगती न्यायिक न्यायाधिकरणाची स्थापना करण्याची मागणीही मंचने केली आहे. तसेच नागरी आणि लष्करी गुप्तचर यंत्रणांमध्ये लपलेल्या कथित दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, इन्कलाब मंचने सरकारला इशारा दिला आहे की हादी हत्येप्रकरणी न्याय न मिळाल्यास अंतरिम सरकारविरोधात व्यापक आंदोलन छेडले जाईल. २४ तासांचा अल्टिमेटम देऊनही अद्याप ठोस अटक न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनत असल्याचे चित्र आहे.