पराभवाच्या परंपरेचे पाईक!

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
अग्रलेख
udhav thakare प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यशैलीचे काही नेमके वैशिष्ट्य, वेगळेपण असते. काही राजकीय पक्ष देशाच्या, समाजाच्या शाश्वत हिताकरिता सातत्याने प्रयत्न करीत असतात, तर काही ज्या नेत्यांच्या जिवावर अस्तित्व जपतात, त्यांच्या गोतावळ्यापुरता विचार करीत असतात. अशा पक्षांनी नेमके कोणाच्या हिताचे राजकारण केले, त्यातून स्वत: काय कमावले आणि जनतेस काय दिले याचा लेखाजोखा मांडताना, हे दोन फरक स्पष्टपणे समोर येतात. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने आपल्या सहा दशकांच्या राजकारणातून नेमके काय कमावले, काय गमावले आणि जनतेस नेमके काय दिले याचा लेखाजोखा कधीतरी त्रयस्थपणे मांडला जायला हवा. आपले सर्व पूर्वग्रह, सहानुभूती किंवा मतभेद बाजूला ठेवून या पक्षाच्या वाटचालीकडे पाहिल्यास, सहा दशकांच्या राजकारणात हा पक्ष वाटचालीच्या काही पावलांवर पुरता फसत गेल्याचे दिसते. या पक्षाच्या स्थापना काळात बाळासाहेबांच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते मानल्या जाणाऱ्या मनोहर जोशी यांनी एका संशोधन प्रबंधातून हा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यामागे संशोधकाचा त्रयस्थपणा नव्हता.
 
 
 
शिवसेना
 
म्हणूनच, शिवसेनेच्या भविष्यकाळाविषयीचे भाकीत करताना त्यांनीही समाजातील काही मान्यवरांच्या मतांचा आधार घेतला. जोपर्यंत बाळासाहेबांची पुण्याई शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि बाळासाहेबांचे कर्तृत्व पाहिलेली पिढी आहे, तोवर शिवसेनेचे राजकारण प्रभावी राहील आणि पुढे ही पुण्याई कमी होत जाईल, असे परखड भाकीत त्याच पुस्तकात एका ज्येष्ठ व अनुभवी राजकीय निरीक्षकाने नोंदविले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीकडे मागे वळून पाहताना हे भाकीत खरे ठरत असल्याचे दिसून येते. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद-पंचायतींच्या निवडणुकांतील निकालांनी बाळासाहेबांचा वारसा सांगणाèया उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नेतृत्वाची आणि महराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या पक्षाची जागा दाखवून दिली आहे. योग्य राजकीय निर्णय घेऊन व भूतकाळातील असंख्य चुकांचे ओझे उतरवून वेळीच दुरुस्ती केली नाही तर बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून अभिमान मिरविण्याजोगे त्यांच्या गाठीशी काही उरलेले नसेल हे स्पष्ट दिसू लागले आहे.
निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असतात. पराजयाला मात्र कोणीच धनी नसतो. रविवारी लागलेल्या निकालांनंतर महाविकास आघाडीच्या आभासी झेंड्याखाली आभासी पद्धतीनेच एकत्र आलेल्या पक्षांच्या पराभवाचा धनीदेखील असाच अदृश्य झाला आहे. एका बाजूला, भारतीय जनता पार्टीच्या राजकीय वाटचालीतील सर्वांत मोठा विजय म्हणून राज्यातील नगर परिषद निवडणुकांच्या निकालाची ऐतिहासिक नोंद होत असताना, महाविकास आघाडी नावाच्या गाजराच्या पुंगीचा ऐतिहासिक किंवा न भूतो असा पराभव महाराष्ट्रात घडला. भाजपा व भाजपासोबत असलेल्या पक्षांची महायुती आणि काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट व उद्धव ठाकरेंचा गट यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी यांच्या निवडणुकीतील कामगिरीची तुलना केल्यास, हा फरक स्पष्ट होतो. प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक विजयानंतर पुढच्या निवडणुकीत त्याहूनही अधिक देदीप्यमान विजय मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेने सतत निवडणूकमग्न असलेली भाजपा आणि प्रत्येक निवडणुकीतील प्रत्येक पराजयानंतर पुढच्या निवडणुकीत त्याहूनही अधिक दारुण पराभव पत्करणारी महाविकास आघाडी असा हा फरक या निवडणुकांतही कायमच राहिलेला दिसला. ही वाटचाल अशीच सुरू राहिली, तर उद्धव ठाकरेंचा गट व केवळ कागदावर एकत्र असलेल्या महाविकास आघाडीचे राजकीय भवितव्य काय असेल हे वेगळे सांगण्यासाठी कोणत्याही ‘भाकीत-भोंदू’चीदेखील गरज राहणार नाही.
कोणत्याही निवडणुकीतील विजयानंतर नव्या उत्साहाने पुढच्या निवडणुकीसाठी कामाला लागणे, नवी मोर्चेबांधणी करणे आणि विजय मिळालेल्या निवडणुकीतही नजरेस आलेल्या त्रुटी दूर करून त्या दुरुस्त करणारी भाजपाची रणनीती आहे. दुसरीकडे, प्रत्येक पराजयानंतरही त्याचे आत्मपरीक्षण किंवा चिंतन करून विश्लेषणदेखील न करता केवळ आत्ममग्नतेतून अन्य नेत्यांस फडतूस वगैरे समजण्याचे बेमुर्वत राजकारण ही ठाकरे नीती आहे. प्रत्येक निवडणुकीत आपल्याला मतदार सातत्याने नाकारत आहेत, झिडकारत आहेत आणि केवळ द्वेष व सूडभावनेतून ज्यांना फडतूस म्हणून हिणविले त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी वाटचाल करणाèया भाजपप्रणीत महायुतीला स्पष्ट कौल मिळत आहे हे दिसत असूनही ते वास्तव ठाकरे गटाने स्वीकारले नाही. उलट, अस्तित्वातच नसलेली व पुराव्यानिशी दाखवून देता येणार नाहीत अशी कारणे देत पराजयाचे खापर प्रतिस्पर्ध्यावर फोडण्याची राजनीती केली. याआधीच्या अनेक निवडणुकांत धडे मिळूनही त्या वास्तवाकडे साफ दुर्लक्ष करून आत्ममग्न राहणाèया ठाकरेंच्या राजकारणास जनता प्रतिसाद देत नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हातवारे करून, हवेत बाहू उंचावून आणि टोमणे, कोट्या मारून निवडणुकीच्या राजकारणाचे गांभीर्य घालवत हास्यजत्रा फुलविणाऱ्या प्रचारसभांचा प्रभाव आता मतदारांवर पडत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. आपल्या राजकारणाला केवळ प्रतिस्पर्धी पक्षाच्या विद्वेषाची झालर लावणे पुरेसे नाही. प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांना लाखोली वाहून किंवा त्यांच्या शारीरिक उणिवांवर बोटे ठेवून बाष्कळ विनोदाचे फवारे उडवून राजकारणात आपली रेघ प्रतिस्पर्ध्याहून मोठी करण्यात यश येईल अशा भ्रमात राहणे म्हणजे जनतेला मूर्ख समजण्यासारखेच असते. प्रत्येक पराजयानंतर किमान आपल्याला जनतेने का नाकारले असावे याचे चिंतन करण्याची मानसिकता तरी दाखविणे गरजेचे असते. महाविकास आघाडी नावाने एकत्र असलेल्या काँग्रेसमध्ये तशी परंपरा तरी आहे. सारे खापर कोणा श्रेष्ठींच्याच माथी मारले जाणार असल्याच्या जाणिवेने त्या उघड करणे सोयीचे नसल्याने काँग्रेसचे नेते आतल्या आत कुढत तरी असतात. उद्धव ठाकरे यांच्या पक्षास पराभवाची वास्तविक मीमांसा करणे किंवा खऱ्या कारणांचा शोध घेण्याचेच वावडे असल्याने, नवा पराभव हा अगोदरच्या पराभवाहूनही दारुण कसा असतो याचे उत्तरही कधीच सापडणार नाही अशीच स्थिती दिसते.
राज्याच्या सामाजिक समस्यांचा ठोस अभ्यास, राज्याच्या विकासाची नीती, अर्थकारणाचे पैलू किंवा जनतेच्या हिताचे नेमके मुद्दे अशा बाबींवर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मतदारांसमोर काही भक्कम भूमिका मांडल्याचे अभावानेच आढळते. केवळ मनोरंजन करून मतदारांचा कौल मिळविता येईल हा विश्वास मात्र ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात आढळतो. बाळासाहेबांनीही काहीशी अशीच मनोरंजन नीती आपल्या भाषणात वापरली होती.udhav thakare पण तेव्हा त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर काही ठोस भूमिकाही घेतलेल्या आढळतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रत्येक बाबीवरील राजकीय प्रश्नांवर त्यांच्या भूमिकेस महत्त्वदेखील मिळत असे. उद्धव ठाकरे यांनी अशा प्रश्नांवर घेतलेल्या भूमिका अत्यंत उथळ, अभ्यासहीन आणि जाणिवेचा अभाव स्पष्ट दर्शविणाऱ्या असल्याचे सातत्याने स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिकांवरही व्यक्तिगत हट्टाग्रहीपणाचाच प्रभाव होता, हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीतील स्थगिती धोरणातूनही स्पष्ट झाले होते. त्यांच्या या धोरणामुळे विकासाची गती उलट्या दिशेने गेली हा आरोप खोडून काढण्याचा व आपल्या नीतीचे समर्थन करणारी ठोस भूमिका मतदारांसमोर मांडून ती पटवून देण्याचा प्रयत्नही त्यांनी कधीच केलेला दिसत नाही. माणसे जोडणे आणि बेरजेचे राजकारण करणे ही खरी गरजही त्यांनी स्वीकारली नाही. उलट, ‘गेले ते कावळे’ अशी संभावना करून फाजील आत्मविश्वास जपत निष्ठावंतांचीही संभावना करण्याच्या वजाबाकीच्या राजकारणामुळे पक्षाला लागलेली गळतीही त्यांनी गांभीर्याने घेतली नाही. राजकारणाचा असा अनाकलनीय बाज महाराष्ट्राने अन्य पक्षांत कधीच अनुभवलेला नाही. पराजयाची प्रामाणिक मीमांसा करण्याचे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले असते, तर या बाबी त्यांनाही केव्हाच ध्यानी आल्या असत्या. आता ती वेळ गेली आहे. मग पराजयाच्या परंपरेची पालखी मिरविणाऱ्यांचे वेगळे भविष्य काय असणार?