नवी दिल्ली,
G on wife's hand उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात संशय आणि रागातून घडलेली एक धक्कादायक हत्या उघडकीस आली आहे. पत्नीच्या हातावर असलेल्या ‘G’ या अक्षराच्या टॅटूमुळे पतीच्या मनात संशयाचे वादळ उठले आणि अखेर त्याच संशयातून त्याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला. आरोपी पती हा पत्नीपेक्षा तब्बल २४ वर्षांनी मोठा असून तो आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. प्रदीप मिश्रा असे आरोपी पतीचे नाव असून तो ४८ वर्षांचा ऑटो रिक्षा चालक आहे. त्याची पत्नी लक्ष्मी मिश्रा ही साधारण २४ ते २५ वर्षांची होती. लक्ष्मीच्या दोन्ही हातांवर टॅटू होते. एका हातावर पतीच्या नावाची आद्याक्षरे आणि दुसऱ्या हातावर ‘G’ आणि ‘L’ ही अक्षरे होती.

या ‘G’ अक्षरावरूनच प्रदीपला सतत संशय येत होता की तिच्या आयुष्यात दुसरा कोणी पुरुष आहे. पत्नीने अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संशयाने पछाडलेलाच राहिला. दारूच्या नशेत तो वारंवार तिला एकच प्रश्न विचारायचा – “हा G कोण आहे?” १९ डिसेंबर रोजी प्रदीप आपल्या बहिणीकडे जौनपूर जिल्ह्यातील चांदवाक येथे गेला होता. लक्ष्मीही त्याच्यासोबत होती. तेथेही प्रदीपने पुन्हा तोच संशय व्यक्त केला. त्याने लक्ष्मीला तिच्या टॅटूबाबत जाब विचारला. संतापलेल्या लक्ष्मीने स्पष्टपणे सांगितले की ‘G’ हे ‘गुड्डू’साठी आहे, हेच त्याचे लाडके नाव आहे. मात्र प्रदीपने तिचे म्हणणे मान्य केले नाही आणि दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्याच्या बहिणीने हस्तक्षेप करत भांडण थांबवले.
पोलिस चौकशीत प्रदीपने कबूल केले की भांडण संपल्यानंतरही त्याच्या मनातील संशय आणि राग शमला नव्हता. त्याच रात्री सुमारे अकराच्या सुमारास तो चहा पिण्याच्या बहाण्याने लक्ष्मीला घराबाहेर घेऊन गेला. मात्र वाटेतच त्याने तिचा खून करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. दाणगंज परिसरात त्याने आपली ऑटो रिक्षा थांबवली, लक्ष्मीचा मफलर वापरून तिच्यावर हल्ला केला आणि नंतर सिमेंटच्या दगडाने तिच्या डोक्यावर वार करत तिचा जीव घेतला. ओळख पटू नये म्हणून त्याने तिचा चेहरा विद्रूप केला आणि रागाच्या भरात तिच्या पायांवरही दगडाने वार केले. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह ओढत जवळच असलेल्या सुक्या बाजरीच्या ढिगाऱ्यात लपवला आणि वापरलेला दगड झुडपात फेकून दिला.
काही वेळानंतर स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांसाठी अंधारातले होते, मात्र मृत महिलेच्या दोन्ही हातांवरील टॅटू तपासासाठी महत्त्वाचा धागा ठरले. पोलिसांनी टॅटूच्या आधारे बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला. चौकशीत लक्ष्मी मिश्रा बेपत्ता असल्याचे समोर आले आणि तिच्या कुटुंबीयांकडूनही याची पुष्टी झाली. पोलिसांनी प्रदीप मिश्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आणि तो फरार झाल्याचे आढळले. पुढील तपासात प्रदीप हा हिस्ट्रीशीटर असल्याचे उघड झाले. त्याच्याविरोधात चोलापूर आणि चौबेपूर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न म्हणजेच कलम ३०७सह सात गुन्हे दाखल असल्याची नोंद होती. पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून माहिती गोळा केली आणि एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी चोलापूरमधील महमूदपूर परिसरातून त्याला अटक करण्यात आली. प्रदीप मिश्राविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १०३ आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत असून संशयातून घडलेल्या या हत्येने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.