दिवाकर भोयर
धानोरा,
bridge-construction-hunger-strike : धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील शेवटचे गाव जांभळी असून या रस्त्यावर नाळेवाही नावाचा नाला वाहतो. याच नाल्यावर शासनाने 20 वर्षापूर्वी पूल मंजूर केले, पण काम पुढे सरकलेच नाही. प्रशासनाला वांरवार पत्रव्यवहार करूनही बांधकामाकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याने लोकांत कमालीची नाराजी पसरली असून गावकर्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतच्या विभागणीसाठी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी न्यायालय गाठले आणि न्यायालयाच्या आदेशानंतरच नरचुली ग्रामपंचायतची विभागणी करुन जांभळी गावात ग्रामपंचायत झाली. अखेर गावकर्यांचा विजय झाला. पण पुलाचे बांधकाम कधी? हा प्रश्न गावकर्यांना अधांतरी ठेवणारा ठरला. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय, पण जांभळी गावाला जाणार्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू होण्याचे कोणतेही लक्षणे दिसत नसल्याने गावकर्यांनी उपोषणाचे हत्यार उचलण्याचा इशाराच दिल्याने आतातरी प्रशासन जागा होतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रांगी ते जांभळी गावातील अंतर कमी आहे पण प्रवाशांना, गावकर्यांना या मार्गावरुन दररोज ये-जा करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात प्रवाशी, कर्मचारी, विद्यार्थी अथवा ग्रामस्थांना जीव धोक्यात घालूनच नाळेवाहीचा नाला पार करावा लागतो. शेतकर्यांना देखील शेतीच्या कामसाठी पाण्यातुनच प्रवास करावा लागतो. तालुक्यातील शेवटच्या टोकावरील जांभळीपासून एक किमी अंतरावर नाळेवाहीचा नाला वाहतो. त्याला पाण्याचा प्रवाह खुप असतो. नाला मोठा असुन तो रांगी ते जांभळी रोडवर असून गावातील शेतकर्यांच्या शेतजमिनी मोठ्या प्रमाणात नाल्यापलीकडे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतीच्या, दैनंदिन, कार्यालयीन व इतर कामासाठी या नाल्यातून धोकादायक प्रवास करीत जावे लागते. विद्यार्थांना देखील पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. 20 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पुलाचे काम आजतागायत पूर्ण न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात खडतडर प्रवास करावा लागतो. सदर पुलाच्या बांधकामासाठी गावकरी सतत पाठपुरावा करीत आहत पण प्रशासन हलताना दिसत नाही.
तत्कालीन कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम हाती घेतले. परंतु पुलाचे बांधकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी ते काम थांबविले होते. त्यानंतरही बांधकाम सुरू असतानाच त्या कंत्राटदाराची हत्या करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी काँक्रीटचे पिल्लर तयार करण्यात आले. त्यापैकी एक पिल्लर वाकलेला आहे आणि दोन्ही बाजूला पाण्याच्या प्रवाहाने पोखरले आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या नागपूर येथील मुख्य अभियंत्याने गावाला भेट देऊन अर्धवट पडलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच चालू बजेटमध्ये या पुलाच्या बांधकामासाठी खर्चाचा प्रस्ताव तयार केला. मात्र प्रस्ताव गेला कुठे हे गावकर्यांना आजतागायत कळले नाही आणि पुलाचे अर्धवट बांधकामही झाले नाही. 20 वर्षापासुन या पुलाच्या बांधकामाचे भिजत घोंगडे आजतागायत कायम असताना आता गावकर्यांनी उपोषणाचे हत्यार हाती घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.