वर्धा,
fire-in-the-pediatric-ward : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरुग्ण विभागाला आज मंगळवार २३ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागताच कर्मचार्यांनी बाल रुग्ण विभागातील सर्व बालक व नातेवाईकांना तातडीने बाहेर काढल्याने थोडयात जीवितहानी टळली. मात्र, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करून आग विझविली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारत क्रमांक २ मध्ये तळमजल्यावर क्ष-किरण आणि सिटी स्कॅन विभाग, पहिल्या माळ्यावर स्त्री शल्य विभाग तर दुसर्या माळ्यावर बालरुग्ण विभाग आहे. बाल रुग्ण विभागाला लागूनच रेकॉर्ड रुम आहे. बाल रुग्ण विभागात १० बालकांवर उपचार सुरू होते. यावेळी त्या विभागात रुग्णांसह ३० ते ३३ नातेवाईक हजर होते. मात्र, दीड वाजताच्या सुमारास अचानक बाल रुग्ण विभागाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग लागताच रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली.
कर्मचार्यांनी तातडीने रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढले. या विभागाच्या बाजूलाच रेकॉर्ड रुम होती. या आगीत रेकॉर्ड रुम पूर्णत: जळून खाक झाली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून वीज पुरवठा बंद केला. त्यानंतर पाण्याचा मारा करीत आग विझविली. या विभागात सिलींडर, औषधांचे बॉस होते. औषधांचे बॉससह इतरही आवश्यक साहित्यांची राखरांगोळी झाली. जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कुचकामी
आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सामान्य रुग्णालयात ९९ लाख रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली. रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या जलकुंभाला थेट पाईपलाईन जोडण्यात आली. ही यंत्रणा हाताळण्यासाठी काही कर्मचारीही नियुत करण्यात आले. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आग लागली असताना ही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वितच झाली नाही. पाईपमध्ये पाणी नसल्याची गंभीर बाब उजेडात आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दोषींना माफी नाही : बकाने
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता देवळीचे आ. राजेश बकाने आणि आरोग्य महासंचालक शंभरकर यांनी सायंकाळी ४.३० वाजता सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालय प्रशासनाला फायर ऑडिट आणि इलेट्रिक ऑडिट करण्याच्या सूचना केल्या. दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत आ. राजेश बकाने यांनी यावेळी दिले आहे.