अमरावती,
Hindus should have children - Navneet Rana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले असून धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. अमरावतीत केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात तसेच सामाजिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी थेट हिंदू समाजाला उद्देशून वक्तव्य केलं. काही धर्मगुरूंच्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, “जर कोणी उघडपणे चार बायका आणि १९ मुलं असल्याचं सांगत असेल, तर हिंदूंनीही किमान तीन-चार मुलं जन्माला घातली पाहिजेत.” त्यांच्या मते, लोकसंख्येच्या मुद्द्यावरून देशाचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं, त्यामुळे हिंदूंनीही या बाबतीत सजग राहणं गरजेचं आहे. एका मुलावर समाधान मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे, असं विधान करत त्यांनी थेट लोकसंख्यावाढीचा मुद्दा उपस्थित केला.
या वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा पुन्हा आक्रमक भूमिकेत आल्याचं चित्र दिसत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. याच संवादात वनीत राणा यांनी राज्यातील इतर राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी दोघे एकत्र येत असतील तर ते चांगलंच असल्याचं मत व्यक्त केलं. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत शरद पवार यांची भूमिका आधीच स्पष्ट केली होती, असा दावा देखील त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणा म्हणाल्या की, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरले नाहीत. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही त्यांची परिस्थिती कठीण राहील आणि मुंबईत महापालिकेवर भगवा व कमळाचा झेंडा फडकणार असल्याचा दावा त्यांनी केला. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत धार्मिक मुद्द्यांवरून नव्या वादाची ठिणगी पडली असून, येत्या काळात यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.