अनिल कांबळे
नागपूर,
husbands murder case दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून माहेरी आलेल्या महिलेचे गावातील एका युवकासाेबत प्रेमसंबंध जुळले. तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून केला. या हत्याकांडात चाैघांना अटक करण्यात आली हाेती. या प्रकरणी न्यायालयाने पुराव्याअभावी चाैघांचीही निर्दाेष सुटका केली. सत्र न्यायाधीश ए.व्ही. धुळधुळे यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. शरद सूर्यभान ठाकरे, लता विजय ठाकरे, रुक्षपाल सेवकदास पाटील, आणि केशव दिलीप भाेयर (सर्व रा. बेल्लाेरी, कळमेश्वर) अशी निर्दाेष सुटका झालेल्यांची नावे आहेत.
विजय ठाकरे (45) याचे लता हिच्याशी लग्न झाले हाेते. त्यांना 13 वर्षांचा मुलगा आहे. विजयला दारुचे व्यसन हाेते. दारुडा विजय हा पत्नीला नेहमी मारहाण करीत हाेता. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत हाेता. त्यामुळे लता त्याला कंटाळली हाेती. यादरम्यान, लताचे गावातील युवक शरद ठाकरे याच्यासाेबत अनैतिक संबंध जुळले. दाेघेही विजयच्या अपराेक्ष भेटत हाेते. विजयला संशय आल्यानंतर त्याने लताला मारहाण केली. त्यामुळे ती माहेरी कन्हैया डाेल गावाला निघून गेली. 15 एप्रिल 2023 राेजी विजय हा पत्नी लताला भेटायला गेला. त्याने भावाला व मित्राला दुचाकीवरुन साेडून मागितले. पतीला बघताच लताने प्रियकर शरद ठाकरेला फोन केला आणि टीप दिली. शरदने आपले दाेन मित्र रुक्षपाल पाटील आणि केशव भाेयर यांना घेऊन लताचे माहेर गाठले. विजयला घेऊन ते एका बारमध्ये गेले. त्याला दारु पाजल्यानंतर धापेवाड्याजवळ नेऊन दगडाने ठेचून ठार केले. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी लता-शरद या प्रेमी जाेड्यासह चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. न्यायालयाने ठाेस पुराव्याअभावी चाैघांचीही निर्दाेष सुटका केली. न्यायालयात आराेपींची बाजू अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड पराग बेझलवार आणि अॅड. चेतन ठाकूर यांनी मांडली तर सरकारकडून अॅड. माधुरी माेटघरे यांनी बाजू मांडली.