जालोर,
indian woman camera ban राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील गाजीपूर गावात महिला आणि मुलींवर मोबाईल फोन वापरण्याबाबत कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गाव पंचायतीच्या निर्णयानुसार, २६ जानेवारीपासून १५ गावांमध्ये सुना आणि मुलींना स्मार्टफोन किंवा कॅमेरा असलेले फोन वापरण्याची परवानगी मिळणार नाही. त्यांना फक्त कीपॅड फोन वापरण्याची परवानगी असेल. गावी झालेल्या बैठकीत सुजानराम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चौधरी समाजाने हा निर्णय घेतला. पंचायतीने ठरवले की, सुना आणि मुलींना लग्न, सामाजिक कार्यक्रम किंवा शेजाऱ्यांच्या घरी देखील मोबाईल फोन नेण्यास मनाई असेल. अभ्यासासाठी मोबाईल फोन वापरणाऱ्या मुलींना फक्त घरीच वापरण्याची परवानगी असेल; शाळेत किंवा बाहेरील कार्यक्रमात मोबाईल वापरणे बंद असेल.

पंच हिम्मतराम यांनी जाहीर केले की, महिलांच्या फोनचा गैरवापर होऊ नये आणि मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतला गेला. सुजानराम चौधरी यांनी सांगितले की मुली अनेकदा महिलांच्या फोनचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते, म्हणून ही बंदी आवश्यक आहे. ही बंदी फक्त एका गावापुरती मर्यादित नसून, १४ उपविभागांतील १५ गावांमध्ये लागू करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) समाजातील सर्व महिला आणि मुलींना या नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार आहे.