किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक

* आरोपी कृष्णा यास चार दिवसांची पोलिस कोठडी *पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची माहिती

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर,
Kidney racket case : किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर येथून अटक केली आहे. 'कृष्णा' असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 'डॉ. कृष्णा' हे नाव धारण करून तो सोलापुरात वास्तव्यास होता. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मंगळवार, 23 डिसेंबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 

CHANDRPUR 
 
 
 
नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन कुळे हे खाजगी सावकारांच्या कर्जामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नसल्याने त्यांनी समाज माध्यमाचा आधार घेतला. फेसबुकवर किडनी विक्री संदर्भात शोध घेत असताना त्यांची भेट 'डॉ. कृष्णा' नावाच्या ‘प्रोफाईल’शी झाली. आरोपीने रोशन यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांना किडनीच्या बदल्यात 8 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विमानाचे तिकीट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करून रोशन यांना कंबोडिया या देशात नेण्यात आले. कंबोडियातील एका खाजगी रुग्णालयात रोशन कुळे यांची किडनी काढण्यात आली.
 
 
शस्त्रक्रियेनंतर त्यांना ठरलेली रक्कम देण्यासाठी आरोपीने टाळाटाळ सुरू केली. केवळ नावापुरते काही पैसे देण्यात आले आणि त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. भारतात परतल्यावर एका किडनीवर जगताना रोशन यांची प्रकृती खालावली आणि सावकारांचा त्रासही कमी झाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धाडस करून पोलिसांत तक्रार दिली.
यामागे एक मोठे रॅकेट सक्रीय असून, या रॅकेटचे लक्ष्य कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगार तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक असू शकतात. कृष्ण हा फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप्सचा वापर करून गरजूंचा शोध घ्यायचा. त्याने आतापर्यंत कुणाकुणाला कंबोडियाला पाठवले आहे आणि या व्यवहारात कोणत्या मोठ्या डॉक्टरांचा किंवा रुग्णालय साखळीचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. पत्रपरिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे उपस्थित होते.
 
आरोपीनेही विकली होती स्वत:ची किडनी!
 
 
आरोपी कृष्णा याने 2015 मध्ये एक छोटी कंपनी सुरू केली होती. या व्यवसायात तो अपयशी ठरल्याने कर्जात बुडाला होता. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कृष्णा याने कंबोडिया येथील रुग्णालयात आपली किडनी विकली होती. 2018 पासून तो त्या रुग्णालयाच्या संपर्कात होता. आतापर्यंत 10 ते 12 लोकांना किडनी काढण्यासाठी कंबोडिया येथे नेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.