नवी दिल्ली,
Leadership change in Congress काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचे नाव गेल्या काही वर्षांपासून गृहीत धरले जात असताना, आता पक्षातूनच वेगळे संकेत मिळू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राहुल गांधी नव्हे तर प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडे पक्षाचा संभाव्य चेहरा वळतो आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. भारतीय जनता पक्षाने प्रियांका गांधींवर गाझा मुद्द्यावर बोलून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उत्तर देताना इम्रान मसूद यांनी थेट आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. “आधी प्रियांका गांधींना पंतप्रधान बनवा, मग त्या इंदिरा गांधींसारख्या कशा निर्णय घेतात ते पाहू,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वाक्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्व संरचनेबाबत नव्या चर्चेला उधाण आले.
पत्रकारांनी प्रियांका गांधी पंतप्रधान झाल्यास राहुल गांधींची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारताच मसूद यांनी दोघांनाही वेगळे मानण्यास नकार दिला. “राहुल आणि प्रियांका हे दोन वेगळे घटक नाहीत. ते इंदिरा गांधींची नातवंडे आहेत. एकाच चेहऱ्यावरचे दोन डोळे आहेत,” असे म्हणत त्यांनी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावरच भर दिला. मात्र, त्यांच्या वक्तव्यातून प्रियांका गांधींच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेचा स्पष्ट संकेत मिळाल्याचे राजकीय विश्लेषक मानत आहेत.
दरम्यान, बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरही या वक्तव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर तेथे मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भारत-बांगलादेश सीमेवरील आसामच्या काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच काळात बांगलादेशातील खुलना शहरात आणखी एका विद्यार्थी नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या सर्व घडामोडींवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही चिंता व्यक्त केली असून, बांगलादेशातील हिंदू नागरिकांवरील हिंसाचाराबाबत त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. एकीकडे बांगलादेशातील अस्थिरता आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत सुरू झालेली चर्चा, यामुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. इम्रान मसूद यांच्या एका विधानाने राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रियांका गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे येत आहेत का, याकडे आता साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.