नादुरूस्त मिसर मशीनमुळे ३ तास वाहतूक ठप्प

*आष्टी-थार मार्गावर लालपरीही अडकली *विद्यार्थी राहिले परीक्षेपासून वंचित

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
आष्टी (श.), 
traffic-halted : आष्टी-कारंजा (घा.) मार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदार मनमर्जीचा सपाटाच लावत असल्याचा आणखी एक प्रकार आज उजेडात आला. काम सुरू असलेल्या ठिकाणी अनुचित घटना घडू नये म्हणून सूचना फलक लावणे क्रमप्राप्त आहे. पण त्याचा अभाव या ठिकाणी दिसतो. अशातच थार गावाजवळ नादुरूस्त मिस्कर मशीन तब्बल ३ तास रस्त्याच्या मधोमध राहिल्याने आष्टी-थार मार्गावरील वाहतूक तब्बल ३ तास ठप्प झाली होती. याच वाहतूक कोंडीत लालपरीही अडकल्याने परीक्षा देण्यासाठी बसने जाणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले.
 

kl 
 
आष्टी-कारंजा (घा.) मार्गावर मध्यरात्री काम केल्यावर पहाटे ६ वाजता मिसर मशीनमध्ये बिघाड आला. अशातच मिस्कर मशीन रस्त्यावर आडवी उभी करण्यात आली. बंद पडलेली मशीन बर्‍याच वेळानंतर बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याच वाहतूक कोंडीत बसही अडकली. या बसमध्ये शिक्षणासाठी ये-जा करणारे विद्यार्थीही अडकले. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. मिसर मशीनमुळे रस्ताच बंद झाल्याची माहिती अनिकेत ठाकरे यांनी कंत्राटदाराला दिल्यावर त्याची मुजोरी कायम होती. नंतर पुन्हा शर्तीचे प्रयत्न केल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.