अकोला,
akola-news : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल व अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया मंगळवार, २३ पासून सुरू झाली आहे.पहिल्या दिवशी सहा झोनमधून तब्बल ५०८ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली, तरी एकाही इच्छुक उमेदवाराने प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.३० डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.अर्जाची किंमत १०० रुपये असून सोबत माहिती पुस्तिका आहे.२५ व २८ डिसेंबर या सुटीच्या दिवशी अर्ज विक्री व स्वीकृती बंद राहील.

मनपा निवडणुकीच्या रणधुमाळी ला सुरुवात झाली असून २० प्रभागातून ८० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.शहरातील राजकिय वातावरण थंडीच्या दिवसांत चांगलेच तापले आहे.युती-आघाडीचा तिढा न सुटल्याने राजकिय पक्षांकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी अनेक इच्छुकांनी एका पेक्षा जास्त अर्जाची उचल केली आहे.पुढील दोन ते तीन दिवसांत राजकीय चित्र स्पष्ट होताच नामनिर्देशन प्रक्रियेला गती येईल,उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी २० प्रभागांना सहा झोनमध्ये विभागण्यात आले असून,स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत सकाळी १० ते ३ या वेळेत उमेदवारी अर्जाची खरेदी व स्वीकृती होत आहे.
झोननिहाय विक्री झालेले अर्ज
निवडणूक निर्णय अधिकारी झोन क्रमांक १ अंतर्गत एकूण ६१ इच्छुक उमेदवारांनी ९३ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. झोन क्रमांक २ मध्ये ५० उमेदवारांनी ९०, झोन क्रमांक ३ ७५ इच्छुक उमेदवारांनी १२६ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे. त्याचप्रमाणे झोन क्रमांक ४ अंतर्गत ३९ उमेदवारांनी ६२ नामनिर्देशन पत्रे, झोन क्रमांक ५ मध्ये ३७ उमेदवारांनी ६८ नामनिर्देशन पत्रे, तर झोन क्रमांक ६ मध्ये ३४ उमेदवारांनी ६९ नामनिर्देशन पत्रे घेतली आहेत सहा झोनमधून एकूण २९६ इच्छुक उमेदवारांनी ५०८ नामनिर्देशन पत्रांची उचल केली.
अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे
नामनिर्देशनपत्र, शपथपत्र नोटरी, राखीव जागेसाठी अर्ज असल्यास जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे पडताळणी अर्ज केल्याची पोचपावती, उमेदवार दुसऱ्या प्रभागातील असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचा मतदार नोंदणी दाखला, अनामत पावती, उमेदवार राजकीय पक्षाचा असल्यास जोडपत्र एक व दोन, महानगरपालिका थकबाकी नसल्याचा दाखला
उमेदवारी दाखल करण्याच्या अटी
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी वयाची २१ वर्षे पूर्ण होणे बंधनकारक, बहु सदस्य प्रभाग पद्धतीमध्ये एक उमेदवार एका प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढू शकेल तथापि अन्य प्रभागातील जागेवर त्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्यावर बंदी असणार नाही. एका जागेसाठी एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येते.विवाह नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे. सर्वसाधारण जागेतील उमेदवारांसाठी अनामत रक्कम रुपये ५००० व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी या राखीव जागेतील उमेदवारांसाठी रक्कम रुपये २५०० याप्रमाणे निश्चित केली आहे. प्रत्येक जागेसाठी स्वातंत्र्य अनामत रक्कम आवश्यक आहे.
नामनिर्देशन ऑफलाईन, खर्चाचा हिशोब ऑनलाईन
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नामनिर्देशन प्रक्रियेत कोणताही ऑनलाईन पर्याय उपलब्ध नसून उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला प्रचार व अन्य बाबींवरील खर्चाचा तपशील ठेवणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी उमेदवारांनी स्वतःची स्वतंत्र ऑनलाईन साइट किंवा प्लॅटफॉर्म तयार करून दैनंदिन खर्चाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.प्रचारादरम्यान झालेल्या सर्व खर्चाची अचूक व वेळेत नोंद ठेवणे आवश्यक असून, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खर्चाचा हिशोब मागितल्यास उमेदवारांनी संबंधित ऑनलाईन नोंदींची प्रिंट काढून सादर करावी लागणार आहे.