ज्यांना बॅनरवर नाकारले, त्यांना जनतेने स्वीकारले

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
municipal-council-results : राजकारण हे केवळ आकड्यांचे गणित नसून ते बुद्धिबळातील चाल आणि क्रिकेटमधील शेवटच्या चेंडूप्रमाणे असते. शेवटच्या क्षणी कोणती बाजी उलटेल, हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या हदगाव नगर परिषद निवडणुकीत स्पष्टपणे आला.

jkl
 
 
 
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा यांच्यात जिल्हास्तरावर युतीचे संकेत देत भाजपाला पाच जागा देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्ष नियोजनात भाजपा चारच जागांवर निवडणुकीत उतरला. त्यामध्येही एक जागा सुरवातीपासूनच स्पष्ट न झाल्याने समीकरणे बदलली.
प्रभाग क्र.1 मध्ये भाजपाला मोकळीक देण्यात आली, तर उर्वरित प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. यातील सर्वाधिक लक्षवेधी व चर्चेत राहिलेली लढत प्रभाग क्रमांक चार (अ) मध्ये झाली. ही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होती. या ठिकाणी भाजपचे युवा तालुका अध्यक्ष साई बाभुळकर यांच्या मातोश्री रुखमा बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आली.
या प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली दुसरा उमेदवार उभा राहिल्याने लढत अटीतटीची झाली. काही दिवस उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न झाले, मात्र ते अयशस्वी ठरले. परिणामी प्रचाराच्या काळात शहरात झालेल्या बॅनरबाजीमध्ये रुखमा बाभुळकर यांना अपेक्षित स्थान मिळाले नाही. काही बॅनरवर तर त्यांचा उल्लेखही नसल्याची चर्चा होती.
राजकीय शिष्टाचार आणि संघटनात्मक समन्वयाच्या दृष्टीने ही बाब अनेक कार्यकर्त्यांना खटकणारी ठरली. मात्र अशा परिस्थितीतही साई बाभुळकर व त्यांच्या सहकाèयांनी संयम राखत कार्यकर्त्यांची ताकद आणि जनसंपर्काच्या जोरावर लढत शेवटपर्यंत नेली.
मर्यादित प्रचार, अपुरी दृश्यमानता आणि प्रतिकूल वातावरण असूनही रुखमा बाभुळकर यांनी विजय मिळवला. ज्यांना प्रचारात दुय्यम स्थान मिळाले, त्यांना जनतेने थेट स्वीकारल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले.
निवडणूक निकालानंतरची स्थिती पाहता, या विजयाची सर्व स्तरांवर दखल घेतली जात आहे. चर्चेतून समोर येणाèया माहितीनुसार, विविध पदाधिकारी व नेते त्यांच्या भेटीस जाऊन सन्मान करीत आहेत. काही ठिकाणी यापूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या उमेदवाराला आता प्रचार माध्यमांत स्थान मिळताना दिसत आहे.
साई बाभुळकर व त्यांच्या भाजपा चमूचे जिल्हास्तरावर कौतुक होत असून, त्यांच्या मातोश्रींचा हा विजय हदगावच्या राजकारणात एक महत्त्वाचा संदर्भ ठरत आहे.