शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात रॅगिंगचा आरोप

- अँटी-रॅगिंग समितीची चौकशी सुरू

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
government-ayurveda-college-ragging : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील मुलींच्या वसतिगृहात कनिष्ठ विद्यार्थिनींच्या रॅगिंगचा गंभीर आरोप समोर आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने तातडीने पावले उचलत अॅन्टी-रॅगिंग समितीमार्फत सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा चौकशी अहवाल ३० डिसेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सोनेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १८ डिसेंबर रोजी एका निनावी ई-मेलद्वारे रॅगिंगबाबत तक्रार प्राप्त झाली होती.
 
 
raging
 
 
ही तक्रार थेट केंद्रीय रॅगिंग समितीकडे करण्यात आली असून, तेथून ती महाविद्यालय प्रशासनाकडे पाठवण्यात आली. तक्रारीनुसार, वसतिगृहातील वरिष्ठ विद्यार्थिनींकडून नवीन व कनिष्ठ विद्यार्थिनींना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. गेल्या १५ ते २० दिवसांत दोन वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारीत शारीरिक रॅगिंगचा उल्लेख नसला, तरी मानसिक छळ, अपमानकारक व त्रासदायक वर्तन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार प्रामुख्याने रात्री १० वाजल्यानंतर घडत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. भीतीमुळे तक्रारदाराने आपली ओळख तसेच नेमक्या तारखा उघड करण्यास नकार दिला आहे. या घटनांमुळे वसतिगृहात राहणाऱ्या नवीन विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 
 
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. जयंत गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखालील अॅन्टी-रॅगिंग समितीकडे चौकशी सोपवण्यात आली आहे. या समितीत डॉ. नीता केदार यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. काही प्रशासकीय कारणांमुळे चौकशी प्रक्रियेला विलंब झाला होता; मात्र आता प्रत्यक्ष सुनावणी व तपास सुरू करण्यात आला आहे. चौकशीत रॅगिंग झाल्याची पुष्टी झाल्यास दोषी विद्यार्थिनींवर नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. सोनेकर यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयात रॅगिंगविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवले जात असून, विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य हेच प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.