नागपूर,
indigo-airlines : येत्या २५ डिसेंबर म्हणजेच नाताळाच्या मुहूर्तावर नागपूर-नवी मुंबईदरम्यान थेट विमान सेवा सुरू होत आहे. ८०० किमीचे अंतर केवळ दीड तासात पूर्ण होणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार तसेच वेळेची बचत होणार आहे. नागपूर ते नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आता व्यावसायिक उड्डाणे सुरू होत आहेत. यामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार आहे.
नवी मुंबई विमानाचे प्रस्थान सायंकाळी ४ वाजता
मुख्यत: नवी मुंबईत जाण्यासाठी नागपूरच्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय उतरल्यानंतर वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करावा लागतो. नव्या विमानसेवेमुळे आता वेळ वाचणार आहे. तसेच ट्रॅफिकची कटकट संपणार आहे. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याने इंडिगो एअरलाइन्सची ही सेवा दररोज उपलब्ध करुन दिली आहे. इंडिगो विमान क्रमांक ६३-८१७ आणि ८१८ चे बुकिंग आधीच सुरू झाले असून हे विमान नवी मुंबईहून दुपारी १.४५ वाजता रवाना होईल आणि दुपारी ३.२० वाजता नागपूर विमानतळावर पोहचेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर ते नवी मुंबई विमानाचे प्रस्थान सायंकाळी ४ वाजता होईल. सायंकाळी ५.३५ वाजता नवी मुंबईला पोहोचेल. प्रवासाचा कालावधी अंदाजे १ तास ३५ मिनिटांचा असून, तिकीट दर अंदाजे ६ हजार रुपये राहील. यामुळे प्रवाशांचा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे.
विमानसेवा बहुउपयोगी ठरणार
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर नवी मुंबई गाठण्यासाठी प्रवाशांना रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करावा लागतो. अनेकवेळा नागपूर ते मुंबई प्रवासापेक्षा जास्त वेळ मुंबई विमानतळ ते नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाला लागत असल्याने ही विमानसेवा बहुउपयोगी ठरणार आहे. नवी विमानतळ पूर्णत: कार्यान्वित झाल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. मुंबई विमानतळावरून नवी मुंबईला जाण्यासाठी टॅक्सी किंवा कॅबचे भाडे साधारण एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत घेतल्या जाते. आता थेट नवी मुंबईत उतरल्यामुळे प्रवास खर्च वाचणारच आहे.