नागपूर,
s-venkata-mohan : पर्यावरण विज्ञानाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सीएसआयआर–राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), नागपूरचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांना वर्ष २०२५ साठीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ‘विज्ञान श्री’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात हा सन्मान देण्यात आला.

पर्यावरण विज्ञान व अभियांत्रिकीच्या क्षेत्रात केलेल्या मूलभूत, नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संशोधनासाठी डॉ. मोहन यांची निवड करण्यात आली. पदक व प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या शाश्वत पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि संशोधनातील उत्कृष्टतेची पावती आहे. डॉ. मोहन यांचे संशोधन जैव-अभियांत्रिकी व परिपत्र जैव-अर्थव्यवस्था (सर्क्युलर बायोइकोनॉमी) या संकल्पनांवर आधारित आहे. बायोरिफायनरी, निम्न-कार्बन ऊर्जा आणि ‘अपशिष्ट ते संपदा’ (वेस्ट-टू-वेल्थ) तंत्रज्ञान या क्षेत्रांतील त्यांच्या अग्रगण्य कार्यामुळे सांडपाणी प्रक्रिया, कार्बन डायऑक्साइड जैव-अवशोषण (बायो-सीक्वेस्ट्रेशन) आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला नवी दिशा मिळाली आहे.
त्यांच्या संशोधनामुळे पर्यावरणीय समस्यांवर व्यवहार्य व मोजमापयोग्य उपाय उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी ४५० हून अधिक संशोधन शोधनिबंध प्रकाशित केले असून १६ पेटंट्स त्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. तसेच ४२ पीएच.डी. संशोधकांचे त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. यापूर्वीही डॉ. मोहन यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, आयएनएई–एसईआरबी अब्दुल कलाम तंत्रज्ञान नवोन्मेष राष्ट्रीय फेलोशिप आणि डीबीटी–टाटा इनोव्हेशन फेलोशिप असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘विज्ञान श्री’ पुरस्कारामुळे शाश्वत पर्यावरण संशोधनातील भारताचे नेतृत्व अधिक बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.