तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
bjp-victory-rally : शहरात भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आतिश बोरेले यांच्या विजयानिमित्त भव्य विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार राजू तोडसाम यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रॅलीची सुरुवात आखाडा भागातून करण्यात येऊन शहरातील प्रमुख चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते, नवनिर्वाचित सहाही नगरसेवक आणि इतर सर्व पराभूत झालेले उमेदवार सहभागी होते. सोबत महिला आघाडी, युवक आघाडी व विविध सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे नगराध्यक्षासह सर्व विजयी उमेदवारांनी आशीर्वाद घेत जनतेचे आभार मानले. पांढरकवडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.
विजयी रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. रॅलीमुळे शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.