पांढरकवडा नगर परिषद निकाल; भाजपा-शिवसेनेला संमिश्र यश, काँग्रेसची दयनीय अवस्था

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
pandharkawada-municipal-council-results : नगर परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांना यश मिळाले असले तरी दोन्ही आघाड्यांमध्ये पूर्ण समाधानाचे वातावरण दिसून आले नाही. भाजपाचे 6 सदस्य, तर शिवसेनेचे 16 सदस्य विजयी झाले. मात्र नप अध्यक्षपदावर भाजपाच्या आतिश बोरेले यांनी 7829 मते घेत विजय मिळविल्याने भाजपाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.
 
 

k 
 
 
 
यात तब्बल 16 नगरसेवक विजयी होऊनही शिवसेना उमेदवार अभिनय नहाते यांना 7626 मते मिळून झालेला निसटता पराभव खेतानी फाउंडेशनच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आर्णी मतदारसंघात आपले हातपाय पसरवण्याचे स्वप्न पाहणाèया खेतानी गटास घाटंजीत मोठे अपयश आले आहे.
 
 
दुसरीकडे, काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय ठरली आहे. तिवारी बंधूंच्या खांद्यावर हात ठेवूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. सर्वच प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाल्याने पक्षाची स्थानिक पकड कमकुवत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद तिवारी यांच्या सभांनी वातावरण चांगलेच तापले होते. परंतु त्यांना फक्त 1486 मते मिळाली. तर भाजपाकडून नप अध्यक्षपदासाठी दावेदारी करणारे शंकर बडे यांनी प्रहारतर्फे समर्थीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
 
 
त्यांचीसुद्धा घोडदौड 1066 मतांवर थांबली. परंतु स्वतःच्या बळावर त्यांनी घेतलेली मते काँग्रेसला आरसा दाखवणारी आहे. कार्यकर्त्यांची फळी, माजी मंत्री शिवाजी मोघे, खासदार प्रतिभा धानोरकर आणि शेतकरी नेते आणि माजी राज्यमंत्री दर्जाप्राप्त किशोर तिवारी, माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांची भक्कम साथ राहूनसुद्धा काँग्रेसचे पानिपत पक्षासाठी दुर्दैवी ठरणारे आहे.
 
 
प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार बोटावर मोजता येईल इतक्या कमी मताने पराभूत झाले. शिवसेनेला मुस्लीम प्रभागात मोठे मतदान मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेने प्रचारात मागे पडलेली शिवसेना आघाडीवर आली. तर भाजपासाठी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर आणि आमदार राजू तोडसाम यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.
 
 
उबाठा गटातर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय झोटिंग आणि टायगर फोर्सचे अंकित नैताम काँग्रेसकडून मैदानात होते. परंतु त्यांचा पराभव अनेकांना न पचणारा होता. यावेळी नप अध्यक्षासाठी इतर उमेदवारांपैकी उबाठाचे किशोर कनाके यांनी 290 मते, एमआयएमचे नौशाद तंवर 140 मते तर मोहन मॅनेवार यांना फक्त 52 मते आणि नोटाला 91 मते मिळाली.