पॅट कमिन्स आणि लिऑन बाहेर; बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा नवा संघ जाहीर

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
पर्थ,
Pat Cummins and Lyon are out ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, बॉक्सिंग डे कसोटीत संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स आणि अनुभवी फिरकीपटू नाथन लिऑन यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी झाय रिचर्डसन आणि टॉड मर्फी यांना संधी देण्यात आली असून, विशेष म्हणजे रिचर्डसन तब्बल चार वर्षांनंतर कसोटी संघात परतत आहे.
 
 

Pat Cummins and Lyon are out 
पॅट कमिन्सला विश्रांती देण्याचा निर्णय हा संघ व्यवस्थापनाच्या कामाच्या ताणाच्या नियोजनाचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधीही दुखापतीच्या काळात किंवा कामाच्या ताणामुळे कमिन्सला विश्रांती देण्यात आली होती. नाथन लिऑन मात्र तिसऱ्या कसोटीत उजव्या मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे बॉक्सिंग डे कसोटी खेळू शकणार नाही. त्यामुळे संघात दुसऱ्या फिरकीपटूचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कमिन्सच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. २९ वर्षीय रिचर्डसनने २०२१ साली इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर दुखापती आणि संघातील स्पर्धेमुळे तो संघाबाहेर होता. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याला पुन्हा कसोटी संघात संधी मिळाली असून, आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांत त्याने ११ बळी घेतले आहेत.
 
नाथन लिऑनच्या जागी निवड झालेला टॉड मर्फी हा युवा फिरकीपटू असून, त्याच्याकडे सात कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. या कालावधीत त्याने २२ बळी घेतले आहेत. मात्र, विशेष बाब म्हणजे मर्फीने अद्याप ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत त्याला अंतिम संघात स्थान मिळाल्यास, तो त्याचा घरच्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना ठरेल. मर्फीने शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळला होता. पॅट कमिन्स संघात नसल्यामुळे पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथने यापूर्वीही अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते आणि आता तो मेलबर्नमध्येही कर्णधारपद भूषवणार आहे.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी घोषित करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशाने, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, जेक वेदरॉल्ड, ब्यू वेबस्टर, अ‍ॅलेक्स केरी, जोश इंग्लिस, मिशेल स्टार्क, स्कॉट बोलँड, मायकेल नेसर, ब्रेंडन डॉगेट, झाय रिचर्डसन आणि टॉड मर्फी यांचा समावेश आहे.