तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
devendra-fadnavis : यवतमाळच्या नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांनी मंगळवार, 23 डिसेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहपरिवार भेट घेतली. यावेळी त्यांनी यवतमाळ शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस पथक गठीत करण्याची मागणी केली.
भेटीदरम्यान अध्यक्ष अॅड. उईके यांनी यवतमाळ शहरात महिला व मुलींची सुरक्षितता अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. सद्यस्थितीत सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ, शैक्षणिक परिसर, बसस्थानक व इतर गर्दीच्या भागांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व तत्पर विशेष पथक कार्यरत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महिलांच्या सुरक्षिततेसाठी सकारात्मक भूमिका घेत विशेष पोलिस पथक निर्माण करण्याबाबत सहमती दर्शवली. यावेळी अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासमवेत त्यांचे वडील आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आई बीना व बहीण तेजस्विनी उपस्थित होत्या.