काबुल,
Rashid Khan is insecure तालिबानच्या नियंत्रणाखालील अफगाणिस्तानात राहणे आपल्यासाठी सुरक्षित नसल्याची स्पष्ट कबुली स्टार फिरकीपटू रशीद खानने दिली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्याशी झालेल्या एका मुलाखतीत रशीद खानने आपल्या सुरक्षेबाबत धक्कादायक माहिती उघड केली. अफगाणिस्तानात तो सामान्य कारमधून प्रवास करू शकत नाही आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी त्याने बुलेटप्रूफ कार खरेदी केल्याचे त्याने सांगितले. रशीद खानचे हे वक्तव्य ऐकून केविन पीटरसनही आश्चर्यचकित झाला.

केविन पीटरसनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीबद्दल रशीद खान मोकळेपणाने बोलताना दिसतो. संभाषणादरम्यान पीटरसनने रशीदला विचारले की अफगाणिस्तानात त्याचे दैनंदिन आयुष्य कसे आहे आणि तो रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतो का. यावर रशीद खानने थेट उत्तर दिले की, तसे करणे शक्यच नाही. सामान्य कारने प्रवास करणे तर दूरच, रस्त्यावर चालणेही त्याच्यासाठी सुरक्षित नाही, असे त्याने स्पष्ट केले. रशीद खानने सांगितले की काबूलमध्ये त्याच्याकडे स्वतःची बुलेटप्रूफ कार आहे आणि तो केवळ त्याच वाहनातून प्रवास करतो. हे ऐकून केविन पीटरसनने आश्चर्य व्यक्त करत काबूलसारख्या शहरात बुलेटप्रूफ कारची गरज का भासते, असा प्रश्न विचारला. त्यावर रशीद खानने सांगितले की ही केवळ खबरदारी असून कोणत्याही क्षणी परिस्थिती बिघडू शकते. कुठे, केव्हा आणि कशा प्रकारचा धोका निर्माण होईल, याचा अंदाज बांधता येत नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
रशीद खानने पुढे सांगितले की कधी कधी रस्त्यावर असताना अनोळखी लोक कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रसंगी बुलेटप्रूफ वाहन असल्यामुळे किमान स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित होते. त्याच्या या अनुभवावर केविन पीटरसनने पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केले. मात्र रशीद खानसाठी ही परिस्थिती नवीन नाही, कारण अफगाणिस्तानात बुलेटप्रूफ गाड्या आता सामान्य झाल्या आहेत, असे त्याने स्पष्ट केले. अनेक सामान्य नागरिक आणि प्रभावशाली लोकांकडे अशा गाड्या आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणावर वापरात आहेत. रशीद खानच्या या खुलाशामुळे तालिबानशासित अफगाणिस्तानातील अस्थिर आणि असुरक्षित वातावरणावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला असून, जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्येही त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.