वर्धा,
ravindra-katolkar-arrested : शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास करणार्या यंत्रणेतील अधिकार्यांसह कर्मचार्यांनी २३ रोजी वर्धेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना नालवाडी येथून अटक केली. काटोलकर यांना नागपूर येथील न्यायालयात हजर केले असता २५ डिसेंबरपर्यंतचा पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
नागपूर येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून सेवा देणार्या रविंद्र काटोलकर यांनी शिक्षणाधिकारी म्हणून वर्धेतही सेवा दिली आहे. २४ डिसेंबर २०२१ ते २० मार्च २०२२ या काळात काटोलकर यांनी बोगस शालार्थ आयडीच्या अनुषंगाने मोठा गौडबंगाल करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केली. शालार्थ आयडी घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले उल्हास नरड यांना अटक झाल्यावर नरड यांचीच वर्धा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक पदाचा अतिरित पदभार डॉ. मनिषा भडंग यांना दिले होते. त्यानंतर डॉ. भडंग यांच्याकडून वर्धेचा अतिरित प्रभार काढण्यात आल्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणून जयश्री राऊत यांची नियुती करण्यात आली.
आता शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात अखेर रविंद्र काटोलकर यांना अटक करण्यात आली आहे. काटोलकर यांनी नागपूर येथील शिक्षणाधिकारी प्राथमिक पदाची जबाबदारी सांभाळताना काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची माहिती असतानाही वेतना संबंधाने शाळेकडून आलेल्या प्रस्तावांची कुठलीही शहानिशा न करता त्यांचे नियमित वेतन तसेच थकीत वेतन काढले. यातून काटोलकर यांनी स्वत:ला फायदा करून घेत शासनाची सुमारे १२ कोटींहून अधिकच्या रकमेची फसवणूक केल्याचे चौकशीत पुढे आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने ठोस पुरावे मिळताच शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार्या अधिकार्यांसह कर्मचार्यांच्या चमूने वर्धा गाठून रविंद्र काटोलकर यांना अटक करून पोलिस कोठडी मिळविली आहे.