नरेंद्र सुरकार
सिंदी रेल्वे,
municipal-council-election : गेल्या एक दशकात सत्तेत जाण्यासाठी प्रयत्नरत १८ उमेदवार यावर्षी पुन्हा रिंगणात होते. त्यापैकी फत चार माजी लोकप्रतिनिधी सभागृहात जाण्यासाठी पात्र ठरले. दुसरीकडे मतदारांनी अनेकांचे बारा वाजवले! त्यापैकी ४० उमेदवारांना १०० मतं देखील मिळाली नाहीत. अनेकांची अनामत देखील जप्त झाली.
सिंदी रेल्वे नगर पालिकेची पहिली निवडणूक १९४६ मध्ये झाली होती. तेव्हा निर्वाचित पाच नगरसेवकांनी गणपत झाडे यांना अध्यक्षपद बहाल केले होते. तेव्हापासून येथे विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नशीब आजमावले. भाग्यवानांना पदे भूषवता आली होती, हे तितकेच खरे!
या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडेसह प्रकाश डफ त्यांच्या सौभाग्यवती वनिता, नंदिनी भुते, आशिष देवतळे, शेख अकील, प्रवीण सिर्सीकर, वनिता मदनकर, घनश्याम मेंढे, सुधाकर वल्के, सुमन पाटील, करुणा कुंभारे, पुष्पा सिरसे, बबिता तुमाने या अनुभवींनी यंदा पुन्हा जनतेचा कौल मागितला होता. २ डिसेंबरला येथे अभूतपूर्व ७१.२२ टक्के मतदान झाले होते. रविवारी घोषित निकालानुसार रिंगणात सहभागी १० माजी नगरसेवकांपैकी फक्त सुधाकर वल्के, आशिष देवतळे, घनश्याम मेंढे व शेख अकील या चार जणांची फेरनिवड झाली तर अनेक युवा उमेदवारांना जनसेवेची संधी उपलब्ध करुन दिली. यावर्षी तीन मुस्लीम उमेदवारांनी देखील मतदारांना संधी मागितली होती. पण, माजी नगरसेवक शेख अकील (भाजपा) वगळता कोणालाही विजय मिळवता आला नाही. या निवडणुकीत ज्यांच्याकडे १०० मतांचा गठ्ठा नाही, अशा युवकांनी नशीब आजमावण्याचे धाडस केले आणि त्यातील ४० उमेदवार तोंडावर आपटले. मतदारांनी, सत्तेसाठी हपापलेल्या अनेक जणांना चांगलाच धडा शिकवल्याचे जाणवले. परंतु, काही होतकरू आणि समाजासाठी, शहराच्या विकासाकरिता झपाटलेल्यांचा पराभव मतदारांना चटका लावून गेला, एवढे नक्की!