वर्धा,
steel-coil-truck-overturned : कळमेश्वर येथून ट्रकमध्ये स्टिल कॉईलचे रोल भरून बडोदा, गुजरात येथे जाण्यासाठी निघाले असता नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव घाट उतरून काही अंतरावर उभ्या असलेल्या ट्रकला वाचविण्यासाठी चालकाने प्रयत्न केला. मात्र, उभ्या ट्रकला कट लागून स्टिल कॉईल रोल भरलेला ट्रक पलटी झाला. यात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू तर वाहक जखमी झाला. ही घटना २१ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास तळेगाव (श्या.पं.) येथे घडली. मुकेश कुमार भिल (४३) रा. सबलपुरा ता. जहाजपूर जि. भिलवाडा राजस्थान असे मृत चालकाचे नाव असून सत्यनारायण पोरू भिल (२३) असे जखमी वाहकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक मुकेश कुमार भिल आणि वाहक सत्यनारायण हे २१ रोजी रात्री ८ वाजता कळमेश्वर येथून स्टिल कॉईल रोल भरून बडोदा येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव घाट उतरत असताना काही अंतरावर एक ट्रक उभा दिसला. या ट्रकला वाचविण्यासाठी चालक मुकेशने प्रयत्न केला. मात्र, उभ्या असलेल्या ट्रकला कट लागून समोरच्या उभ्या कारला धडक बसली आणि मुकेशचा ट्रक रोडच्या बाजूला पलटी झाला. उभ्या असलेल्या एम. एच. २३ ए. यू. ६३३६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंडी खांब भरण्याचे काम सुरू होते. अपघात घडताच त्या कामावरील काही नागरिक पलटी झालेल्या ट्रकजवळ येऊन पाहणी केली आणि तसेच निघून गेले.
ट्रकचा चालक मुकेश हा कॅबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लिनर सत्यनारायण हा कॅबिनच्या बाहेर निघाल्याने बचावला. ही घटना सकाळी ७ वाजता रस्त्यावरून जाणार्या एका इसमास दिसून आल्याने त्याने लिनरची विचारपूस केली. त्या इसमाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनद्बारे ट्रक सरळ करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉटरांनी चालक मुकेशला मृत घोषित केले. दरम्यान, लिनर सत्यनारायण याने दिलेल्या तक्रारीवरून रस्त्यावर उभ्या असलेल्या एम. एच. २३ ए. यू. ६३३६ क्रमांकाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.