इस्लामाबाद,
Vaibhav files a complaint with the ICC पाकिस्तान अंडर-19 संघाने भारताविरुद्ध आशिया कपच्या अंतिम सामन्यात जोरदार विजय मिळवला आणि या विजयाच्या उत्सवात वाददेखील जन्माला आला. दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 347 धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाला त्यानंतर अवघ्या 26.2 षटकांत 156 धावांत गुंडाळून पाकिस्तानने 191 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने 13 वर्षांनंतर अंडर-19 आशिया कप विजेतेपद पटकावले, हे त्यांचे स्पर्धेतील दुसरे विजेतेपद ठरले.
सामन्यानंतर पाकिस्तान संघाचे मेंटॉर सरफराज अहमद यांनी भारतीय खेळाडूंनी सामन्यात गैरवर्तन केले असल्याचा आरोप केला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाच्या वर्तनावर तीव्र टीका करत हा मुद्दा औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) मांडणार असल्याचे जाहीर केले. नक्वी म्हणाले की, अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी सातत्याने पाकिस्तानी खेळाडूंना उकसवण्याचा प्रयत्न केला. खेळ आणि राजकारण वेगळे ठेवले पाहिजे. या घटनेची माहिती पाकिस्तान औपचारिकरित्या ICC कडे देणार आहे.
सरफराज अहमद यांनीही भारतीय संघाचे वर्तन अनैतिक आणि क्रिकेटच्या भावना विरोधी असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, सामन्यादरम्यान भारतीय संघाचे वर्तन योग्य नव्हते, तरी आम्ही विजय साजरा करताना खेळभावनेला महत्त्व दिले. या प्रकरणामुळे भारत-पाकिस्तान अंडर-19 क्रिकेटमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत, आणि या वादामुळे पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.