लेखणी वाचकांच्या अंत:करणात पोहोचायला हवी

-डॉ. वसंत आबाजी डहाके यांचे प्रतिपादन -परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
अमरावती,
vasant-abaji-dahake : चळवळीतल्या साहित्यातून वेदना व्यक्त झाली आणि विद्रोहही व्यक्त झाला. आपल्या साहित्याचे प्रेम हे जसे मूल्य आहे, तसेच विद्रोह हेही मूल्य आहे. पिढ्यान्पिढ्या दडपलेल्या मनांनी विद्रोहाची भाषा उच्चारायची नाही तर काय करायचे? तुकाराम महाराजांनी देखील नाठाळाच्या माथ्यावर काठी हाणण्याची भाषा उच्चारली आहे. कवी स्वतःची दुःखे व्यक्त करत असतो, तसेच त्याने जगाची दुःखे व्यक्त करावी. दुःखी पीडित सामान्य जनांविषयी अपार कळवळा असल्याशिवाय विद्रोह जन्माला येत नाही. पण तुकारामांना अभिप्रेत असलेला निर्मळ व निरागस धर्म आपल्या भूमीत रुजावा असे वाटत असेल तर मनात प्रेम असायलाच हवे. म्हणून लेखकांच्या अंत:करणात जिव्हाळा असल्याशिवाय त्यांच्या लिहिण्याचा स्पर्श वाचकांच्या अंत:करणाला होणार नाही, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
 

amt
 
मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित, परिवर्तन प्रबोधिनी, द. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स अमरावती व बिलीव्ह फाऊंडेशन अमरावतीद्वारा आयोजित राज्यस्तरीय तिसरे परिवर्तन विचारवेध साहित्य संमेलन शेगाव नाका अमरावती येथील अभियंता भवनमध्ये उत्साहात सुरू झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. वसंत आबाजी डहाके, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, स्तंभलेखक तथा विचारवंत डॉ. श्यामसुंदर निकम, तर उदघाटक म्हणून भारतीय जैन संघटना पुणेचे विश्वस्त ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शन गांग, रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्य डॉ. प्रभा गणोरकर, पूर्वाध्यक्ष डॉ. रा. गो. चवरे, डॉ. गजानन कोटेवार, इंजि. सुनील राठी, इंजि. राम विघे, परिवर्तन प्रबोधिनी अध्यक्ष शोभा रोकडे, सचिव रेखा बेलसरे हे मान्यवर उपस्थित होते.
 
 
ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची यशस्वी सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. पायल रोकडे यांचे स्वागत नृत्य झाले. डॉ. नयना दापूरकर यांच्या माय मराठी गीताने व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संमेलनाध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांचे हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपूजनाने संमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, डॉ. रमेश अंधारे, मुक्ता केचे, डॉ. राज यावलीकर, रजनी राठी, प्रतिमा इंगोले, अनुराधा वर्‍हाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कथालेखन व काव्यलेखन स्पर्धेतील पुरस्कार वितरण पार पडले.