अनिरुद्ध पांडे
यवतमाळ,
yavatmal-news : संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या जनाधाराला उतरती कळा लागल्याचे चित्र ‘नगर’ निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले आहे. यवतमाळ नगर परिषदेत अस्तित्वहीन झालेल्या उबाठा सेनेच्या हाती मतदारांनी चक्क ‘भोपळा’ दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस व शप, राकाँ या दोन पक्षांसोबत उबाठा शिवसेना आहे. पण यवतमाळपुरते या आघाडीचे विसर्जन येथील उबाठा नेत्यांनी करून टाकले. का, तर म्हणे काँग्रेसने आमचा स्वाभिमान दुखावला, आमचे अस्तित्वच नसल्याची भूमिका घेतली.
सध्या यवतमाळात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातच नप निवडणूक लढणार हे उघड होते. तसेही या शहरात शप राकाँचे फारसे अस्तित्व नसल्यामुळे काँग्रेसला फक्त उबाठा शिवसेनेलाच तेवढे ‘अॅडजेस्ट’ करायचे होते. पण काँग्रेसने आमच्याशी दुर्व्यवहार केला, आमच्यावर अन्याय केला, असा कांगावा करून उबाठाने वेगळी चूल मांडली.
त्यातही गंमत अशी की, काही उबाठा नेत्यांच्या या भूमिकेमुळे उबाठातही फूट पडली. स्थानिक उबाठात सर्वाधिक जनाधार असलेले नेते संतोष ढवळे यांनी आपल्या सहकाèयांशी असहमती दर्शवून ‘आघाडीचा धर्म’ पाळण्याची भूमिका जाहीर केली. त्यानुसार ते काँग्रेस उमेदवार प्रियंका मोघे यांच्यासाठी कामालाही लागले.
दुसरीकडे उबाठा सेनेनेही नप अध्यक्ष पदासाठी वैष्णवी कोवे यांच्यासह बहुतांश नगरसेवकही मैदानात उतरवून टाकले. त्यांच्यामुळे या नप क्षेत्रातील उबाठा सेनेची नेमकी ‘ताकद’ही सर्वांसमोर आली. त्यांना मिळालेला ‘भोपळा’ सर्वांना पाहायला मिळाला.
यवतमाळ नप अध्यक्षपदी निवडून आलेल्या भाजपा या एका पक्षाच्या उमेदवार अॅड. प्रियदर्शनी उईके यांना मते आहेत 57,717. काँग्रेस, शप राकाँ आणि उबाठाचा एक तुकडा यांच्या संयुक्त उमेदवार प्रियंका मोघे यांना मते आहेत 44,994. तर उबाठाच्या अधिकृत उमेदवार वैष्णवी कोवे यांना मते आहेत फक्त 6,039..!
या साèया घटनाक्रमातून उबाठा शिवसेनावाले विश्वासार्ह नाहीत हे काँग्रेसवाल्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आले आहे. तिकडे मुंबईतही उबाठाने मनसेसोबत एकतर्फी युती करून काँग्रेसला जाहीरपणे तोंडघशी पाडले आहेच, हेही उल्लेखनीय.