शालेय सहलींसाठी फक्त लालपरीच

स्कूलबस किंवा खासगी बसने नेल्यास कारवाईची तरतूद

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
lal-pari-buses-school-trips : राज्यातील शाळांच्या सहलींवर आता शासनाने कडक नियम लागू केले आहेत. शिक्षण विभागाच्या नियमानुसार खासगी स्कूलबस किंवा प्रवासी बसने सहल नेल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे शाळांना सहलींसाठी केवळ सरकारी एसटी, म्हणजेच लालपरीचा वापर करावा लागणार आहे. सरकारच्या निर्णयानुसार शाळांनी सहलींसाठी एसटी बसलाच प्रथम प्राधान्य द्यावे, असा स्पष्ट नियम आहे. मात्र अनेक खासगी शाळा त्यांच्या स्वतःच्या स्कूलबसचा वापर करतात किंवा खासगी बस पूर्ण क्षमतेने भाड्याने घेतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे खासगी बस चालकांकडून हवे तसे लक्ष दिले जात नाही.
 
 
ytl
 
खासगी बसेसवरील चालक पूर्णतः प्रशिक्षितही नसतात. काही ठिकाणी प्रवाशी बसवरील चालक मद्यप्राशन करून बस चालवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा चालकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिवहन विभागाने आता यापुढे अशा खासगी वाहनांचा सहलीसाठी वापर केल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळांच्या सहलींसाठी आता फक्त एसटी बस वापरणे अनिवार्य आहे.
 
 
विद्यार्थ्यांना सहलीसाठी एसटीची पसंती मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी महामंडळ देत असलेली 50 टक्के सवलत, ज्यामुळे प्रवास स्वस्त होतो. तसेच सरकारी बस असल्याने सुरक्षेची हमी आणि अलीकडेच मिळत असलेल्या नवीन, चांगल्या बसेसमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. ज्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा एसटीला अधिक पसंती दिली जात आहे.
 
 
स्कूल बस किंवा खासगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि त्यांना किफायतशीर दरात प्रवास उपलब्ध करून देणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले आहेत.
 
 
शालेय सहली विद्यार्थ्यांच्या आनंदमयी होण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवीन बसेस दिल्या जात असून, बसेसवर कुशल चालक-वाहक नियुक्त केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. सध्या शालेय सहलींसाठी विविध शाळांचा बस नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सहलींसाठी वॉटरपार्क, रिसॉर्टऐवजी फक्त ऐतिहासिक स्थळे
 
 
अनेक शाळा विद्यार्थ्यांना सहलीच्या ठिकाणी नेताना वॉटर पार्क किंवा रिसॉर्टमध्ये नेऊन मनोरंजन करतात. मात्र, यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कुठलीही भर पडत नाही. त्यामुळे शासनाने आता वॉटरपार्क किंवा रिसॉर्ट्सऐवजी ऐतिहासिक स्थळी ठिकाणी विद्यार्थ्यांची सहन नेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन होण्यास मदत होणार आहे.
सहलींसाठी आता नवीन नियमावली झाली लागू
 
 
प्रत्येक सहलीत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पुरेसे शिक्षक असावेत. धोकादायक सहलींसाठी एक शिक्षक 10 विद्यार्थी आणि कमी जोखमीच्या सहलींसाठी एक शिक्षक 15 विद्यार्थी हे प्रमाण असावे. मिश्र सहलींमध्ये स्त्री आणि पुरुष शिक्षक असावेत. सहलीला जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आवश्यक आहे.