मुंबई,
Ikkis बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा अभिनय क्षेत्रात आपली वाटचाल ठामपणे करत असल्याचे चित्र दिसत आहे. २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’ या चित्रपटातून ओटीटी पदार्पण केलेल्या अगस्त्य नंदा आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘इक्कीस’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, हा चित्रपट परमवीर चक्र विजेते शहीद अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. मूळतः २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.
‘इक्कीस’च्या विशेष प्रदर्शनाला अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट पाहिला आणि आपल्या अधिकृत ब्लॉगवर त्याबद्दल सविस्तर आणि भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. नातवाच्या अभिनयाने आपण भारावून गेल्याचे त्यांनी शब्दांत मांडले आहे.
बिग बी Ikkis आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात की, चित्रपट पाहताना भावना अनावर झाल्या. “आज रात्री माझ्या नातवाला ‘इक्कीस’मध्ये अत्यंत उत्कृष्ट अभिनय करताना पाहिले. त्याक्षणी त्याच्या जन्मापासूनचे अनेक क्षण डोळ्यासमोर उभे राहिले,” असे त्यांनी नमूद केले. अगस्त्यच्या जन्मानंतर काही तासांनी त्याला पहिल्यांदा हातात घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्याचे निळे डोळे, बालपणी दाढीशी खेळणे आणि त्याची हळूहळू झालेली वाढ, ते अभिनेता होण्याचा घेतलेला निर्णय आणि आज चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये त्याला पाहणे, हा प्रवास आपल्यासाठी भावनिक असल्याचे त्यांनी लिहिले.अमिताभ बच्चन यांनी अगस्त्यच्या अभिनयाचे विशेष कौतुक करताना म्हटले की, त्याचा अभिनय परिपक्व, संयमित आणि व्यक्तिरेखेत पूर्णपणे मिसळलेला आहे. “अगस्त्यने अरुण खेत्रपाल यांची भूमिका कोणत्याही ढोंगाविना साकारली आहे. ही भूमिका थेट हृदयाला स्पर्श करते,” असे ते म्हणाले. १९७१ च्या भारत-पाक युद्धात वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकाचे व्यक्तिमत्त्व अगस्त्यने प्रामाणिकपणे पडद्यावर जिवंत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक फ्रेममध्ये त्याची Ikkis उपस्थिती ठळकपणे जाणवते आणि तो स्क्रीनवर दिसला की प्रेक्षकांचे लक्ष आपोआप त्याच्याकडे जाते, असे मत बिग बी यांनी व्यक्त केले. “हे शब्द आजोबांचे नाहीत, तर एका अनुभवी सिनेमा प्रेक्षकाचे आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या प्रतिक्रियेला भावनिकतेपलीकडे नेले आहे.अमिताभ बच्चन यांच्या या प्रतिक्रियेमुळे ‘इक्कीस’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली असून, अगस्त्य नंदाचा हा मोठ्या पडद्यावरील पहिला चित्रपट त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.