नवी दिल्ली,
bangladesh-india भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक दशकांपासून घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या असंख्य वस्तूंमध्ये बांगलादेश भारतावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही देशांतील तणावपूर्ण वातावरण आणि बांगलादेशमधील अंतर्गत राजकीय अस्थिरतेमुळे या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर भारतातून होणारा पुरवठा खंडित झाला, तर अन्नधान्यापासून कपड्यांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये बांगलादेशला गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गहू हा बांगलादेशसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो मोठ्या प्रमाणात भारतातून आयात केला जातो. बंदीपूर्व काळात भारतातून कोट्यवधी डॉलर्सचा गहू बांगलादेशमध्ये गेला होता. bangladesh-india याशिवाय तांदूळ, साखर, कांदे, बटाटे, लसूण, मसाले, धान्ये तसेच फळे आणि भाज्याही भारतातून मोठ्या प्रमाणात पुरवल्या जातात. या वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला की बांगलादेशमध्ये दरवाढ तात्काळ जाणवते. कापूस हा बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाचा कणा मानला जातो. भारताच्या एकूण कापूस निर्यातीपैकी मोठा हिस्सा बांगलादेशकडे जातो. याशिवाय रिफाइंड पेट्रोलियम उत्पादने, प्लास्टिक, स्टील, इलेक्ट्रिकल उपकरणे तसेच औषधे आणि वैद्यकीय साहित्य या क्षेत्रांतही भारत बांगलादेशचा प्रमुख पुरवठादार आहे.
भौगोलिक रचनेमुळेही बांगलादेश भारतावर अवलंबून आहे. देशाचा बहुतांश भाग भारताशी सीमा सामायिक करतो, त्यामुळे वाहतूक, व्यापार आणि पुरवठा साखळी सुलभ होते. कमी खर्चात आणि कमी वेळेत वस्तू उपलब्ध होणे हा भारताचा मोठा फायदा आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार जवळपास १६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. याशिवाय भारताने गेल्या काही वर्षांत बांगलादेशला पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात विकास सहाय्य दिले आहे. चीन बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक करत असला तरी, तज्ज्ञांच्या मते भारतासारखा खर्च, अंतर आणि पुरवठ्याचा फायदा अन्य कोणताही देश देऊ शकत नाही. विशेषतः वस्त्रोद्योगासारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय कच्च्या मालावर असलेले अवलंबित्व सहज कमी होणारे नाही. bangladesh-india त्यामुळे भारतातून होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यास त्याचा थेट परिणाम बांगलादेशच्या महागाई, रोजगार आणि एकूण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
दरम्यान, बांगलादेशमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने काही व्हिसा केंद्रांचे कामकाज तात्पुरते स्थगित केले असून, काही ठिकाणी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एका हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भारताने बांगलादेश सरकारकडे केली आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश संबंध आणि व्यापाराचे भवितव्य महत्त्वाचे ठरणार आहे.